दिनांक 06 April 2020 वेळ 4:42 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » दुरूस्तीच्या प्रतिक्षेत ”बेवारस” खोडाळा मंडळ कृषी कार्यालय

दुरूस्तीच्या प्रतिक्षेत ”बेवारस” खोडाळा मंडळ कृषी कार्यालय

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 27 : तालुक्यातील अतिशय महत्वाचे आणि शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असलेले खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय मोडकळीस आले असुन येथील कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेऊन कार्यालयीन कामकाज करावे लागत आहे. ही इमारत कधीही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याने इमारतीच्या शेजारी राहणार्‍या रहिवाशांच्या जिवीतालाही धोका होणार असल्याने इमारतीची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी खोडाळा ग्रामपंचायतीने केली आहे.
सन 1970-80 च्या दशकात प्रशिक्षण व भेट योजने अंतर्गत राज्य सरकारच्या निधीतुन सदर इमारत उभारण्यात आली आहे. मात्र त्यानंतर या इमारतीची किरकोळ दुरूस्तीही करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत येथून मंडळ कृषी कार्यालयाचा कारभार पाहिला जातो. परंतु इमारत कृषी विभागाची की, जिल्हापरिषदेची की राज्यसरकारची? याबाबत दुमत असल्याने आजतागायत या इमारतीची दुरूस्ती झालेली नाही. असे असले तरी राज्य सरकारच्या अधिपत्त्यात प्रस्तुत इमारत येत असल्याने राज्याच्या विकास निधीतुन तिची दुरूस्ती करण्याची संयुक्तिक मागणी खोडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील व उपसरपंच मनोज कदम यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
मोखाडा तालुका कृषी कार्यालयांतर्गत येणार्‍या या कार्यालयातून परिसरातील 30 हून अधिक गावांतील शेतीविषयक कामकाज तसेच इतरही अनेक विकास कामे केली जातात. त्यामुळे येथे शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. त्याचबरोबर शेतीविषयक मार्गदर्शन शिबीरं, बैठका, दैनंदिन कामे इत्यादी कामे करताना भेगा पडलेल्या भिंतीकडे पाहून कर्मचार्‍यांना नैमित्तीक कामांचा निपटारा करावा लागत आहे.
या कार्यालयाची अवस्था अतिशय भयानक झालेली असून भिंतीसह छप्परावरही मोठे झाड उगवलेले आहे. या झाडाच्या मुळ्या थेट भिंत पोखरून कार्यालयात डेरेदाखल झाल्याने इमारतीचा धोका आणखीनच वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागासह जिल्ह्याच्या वरिष्ठ कार्यालयांनी या धोकादायक इमारतीची व आजुबाजूच्या रहिवाशांच्या जीविताची दखल घेऊन तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
शासन एकीकडे ठाण्या-मुंबईच्या धोकादायक इमारतींची काळजी घेत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण आदिवासींच्या जीवावर उठलेल्या धोकादायक शासकिय इमारती मात्र बेदखल ठेवीत आहे, असा आरोप येथील रहिवास्यांकडून केला जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top