दिनांक 22 September 2019 वेळ 4:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कचर्‍याच्या गाड्या पाठवल्या नगराध्यक्षांच्या दारात!

कचर्‍याच्या गाड्या पाठवल्या नगराध्यक्षांच्या दारात!

वाडा नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांची मनमानी

प्रतिनिधी/वाडा, दि.26 : वाडा नगर पंचायतीत सत्ताधारी व मुख्याधिकारी यांच्यातील बेदिली दिवसेंदिवस वाढत असून आज मुख्याधिकार्‍यांच्या मनमानीने कळस गाठला आहे. शहरातील कचरा टाकण्यासंदर्भात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यात एकमत होत नसल्याने मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांनी कचर्‍याची वाहने थेट नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर यांच्या दारात उभी केल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली असून या घटनेच्या मनस्तापामुळे रक्तदाब वाढल्याने नगराध्यक्षा कोलेकर यांना वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी मवाडेंविरोधात उशीरापर्यंत पोलिसांत तक्रार नोंदविली गेली नसल्याने संतप्त नागरिकांनी वाडा बंद करत या घटनेचा निषेध नोंदवला.

गेल्या अनेक वर्षांपासून वाडा शहराच्या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा व पदाधिकार्‍यांनी डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न निकाली निघावा म्हणून एक खाजगी जागा भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय सुमारे वर्षभरापूर्वी घेतला होता. मात्र त्यानंतर नव्याने हजर झालेल्या मुख्याधिकारी मवाडे यांनी तांत्रिक अडचणी समोर करत या निर्णयास फाटा दिल्याने हे डम्पिंग ग्राऊंड होऊ शकले नाही. त्यामुळे नगरपंचायत शहरातून जमा झालेला कचरा वाडा – भिवंडी रस्त्यालगत टाकत आहे. मात्र या कचर्‍यामुळे येथे मोकाट जनावरांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी गांध्रे येथील नितीन पाटील या युवकाचा सदर ठिकाणी अपघात झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी कचरा टाकण्यास मनाई केल्याने हा प्रश्न अधिक चिघळला आहे.

यानंतर नगर पंचायतीने तातडीने बैठक घेऊन डम्पिंगबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. तर नगर पंचायत पदाधिकार्‍यांनी पूर्वी घेतलेल्या भाडेतत्वावरील जागेच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याऐवजी नव्याने एका खाजगी जागेत कचरा टाकण्याचा निर्णय मुख्याधिकारी मवाडे यांनी घेतला. मात्र त्या जागेसंदर्भात न्यायालयात कौटुंबिक वाद सुरु असल्याने अन्य खातेदाराने कचरा टाकण्यास मज्जाव केल्याने मुख्याधिकार्‍यांचा एकतर्फी निर्णय बारगळला. त्यामुळेच संतप्त झालेल्या मुख्याधिकारी मवाडे यांनी नगराध्यक्षांना दूरध्वनीवरून कचरा आपल्याच दारात टाकतो, असे धमकावत कचर्‍याची वाहने थेट नगराध्यक्षांच्या दारासमोर उभी केली. ही वार्ता संपूर्ण शहरात वार्‍यासारखी पसरल्याने शहरातील शिवसैनिकांनी नगराध्यक्षांच्या घराकडे धाव घेतली.

दरम्यान मुख्याधिकारी मवाडे हे आपण एक आदिवासी महिला लोकप्रतिनिधी असल्याने सार्वजनिकपणे अपमानीत करण्यासाठीच असे वागत असल्याचा आरोप नगराध्यक्षा गितांजली कोलेकर यांनी या घटनेनंतर केला असून या संदर्भात आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेच्या मनस्तापामुळे नगराध्यक्षा कोलेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
यासंदर्भात मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांच्याशी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

यासंदर्भात मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांच्याशी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांचा मनमानी कारभार सुरु असून त्यांच्या विरोधात आम्ही सत्ताधारी सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली असून त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आजच्या घटनेचा आम्ही सर्व निषेध करत असून त्यांना निलंबित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

-संदीप गणोरे
गटनेता शिवसेना, नगरपंचायत वाडा
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top