हितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा

0
178

Rajtantra Media/संजीव जोशी (पालघर) दि. २१: पालघर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार निवडून आणण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसली आहे. भाजप आणि शिवसेना विरोधातील सर्व मते एकत्रित करण्यासाठी ठाकूर हे प्रयत्नशील असून या प्रयत्नांना पहिल्या टप्प्यात मोठे यश मिळाले आहे. धुलिवंदनाचा मुहूर्त साधत बविआच्या पिवळ्या रंगात माकपाचा लाल रंग मिसळला जाणार असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. मनोर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत माकपाचे नेते अशोक ढवळे व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही घोषणा केली. यावेळी बविआतर्फे माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, वसई विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील, आमदार विलास तरे, माकपाचे बारक्या मांगात उपस्थित होते. ही आघाडी लोकसभा निवडणूकीपुरती मर्यादित नसून आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा निवडणुकांमध्ये देखील असेल असेही यावेळी उभय पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले.

यावेळी अशोक ढवळे यांनी मांडलेली भूमिका:

भाजपच्या सत्ताकाळात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ४२ टक्के वाढ, बाल कुपोषणात वाढ, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत अपयश या मुद्द्यांवर भाजपला पराभूत करण्यासाठी पाठिंबा दिला. आमदार ठाकूर यांचा यापूर्वीचा अनुभव चांगला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिल्यास स्वागतच आहे.

हितेंद्र ठाकूर यांनी मांडलेली भूमिका:

भाजप आणि सेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससह उर्वरित सर्व पक्षांकडे पाठिंबा मागितला आहे व प्रयत्न चालू आहेत. खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने भाजपचा कारभार चालू आहे. भाजप व सेनेच्या विरोधातील शक्ती एकत्र आणून त्यांना पराभूत करु. माकपच्या सोबतीने जिल्ह्यात बदल घडवू.

राज्यातील भाजप सरकारचा पाठिंबा काढणार का? जिल्हा परिषदेतील सत्तेतील सहभाग सोडणार का? या प्रश्नावर आमदार ठाकूर यांनी ठोस उत्तरे देणे टाळून आमच्या पाठिंब्यावर राज्य सरकार अवलंबून नाही असे सांगून प्रश्नांना बगल दिली.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या 28 मे 2018 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत वनगा यांचे बंडखोर पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. तर भाजपने कॉंग्रेसमधून बंडखोरी केलेले माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना उमेदवारी देऊन निवडणूक जिंकली होती. या अटीतटीच्या निवडणूकीत भाजपच्या राजेंद्र गावीत यांना 2 लाख 72 हजार 782 मते मिळाली होती. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे 2 लाख 43 हजार 210 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर २०१४ च्या निवडणूकीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव 2 लाख 22 हजार 838 मतांसह तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली 71 हजार 887 पारंपारिक मते शाबूत ठेवून चौथे स्थान राखले तर कॉंग्रेसला अवघ्या 47 हजार 714 मतांसह पालघर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

२०१८ च्या पोटनिवडणुकीचे वैशिष्ट्य काय होते?

भाजप आणि शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. त्यामुळे भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रचारात पूर्ण ताकद लावली होती. त्या तुलनेत बहुजन विकास आघाडीने ही पोट निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नाही. कॉंग्रेस विजयापासून खूप दूर होते. यामुळे भाजप व शिवसेना विरोधी मते बहुजन विकास आघाडी अथवा कॉंग्रेसकडे न जाता भाजप विरोधातील मते सेनेकडे तर सेना विरोधातील मते भाजपकडे विभागली गेली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते देखील मोठ्या प्रमाणात भाजप व सेनेकडे विभागली गेली. राजेंद्र गावीत यांच्या उमेदवारीचा देखील भाजपला लाभ झाला.

आज काय परिस्थिती आहे?

भाजप आणि शिवसेना यांची युती झाली असून त्यांच्या एकत्रित मतांची बेरीज 5 लाख 15 हजार 992 मते इतकी होते. त्या तुलनेत बहुजन विकास आघाडीची स्वतःची 2 लाख 22 हजार 838 मते व माकपची 71 हजार 887 मते अशा एकूण 2 लाख 94 हजार 725 मतांची बविआ कडे जुळवणूक झाली आहे. त्यात कॉंग्रेसची 47 हजार 714 मते जमा झाल्यास मतांची बेरीज 3 लाख 42 हजार 439 पर्यंत पोहोचते. उर्वरित 1 लाख 73 हजार 553 मतांचा फरक तोडण्यासाठी बविआला शिवसेना भाजपची किमान 90 हजार मते स्वतःकडे खेचावी लागतील. भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याच्या चर्चा आहेत. त्यातून निर्माण होणारी भाजपमधील संभाव्य नाराजी, पालघर नगरपरिषद निवडणूकीतील शिवसेनेची मोठी बंडखोरी व राजेंद्र गावीत यांच्या खच्चीकरणामुळे त्यांना मानणाऱ्यांच्या मनातील खदखद याचा उपयोग करुन घेण्यासाठी बविआ प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.

राजेंद्र गावीत यांच्या नावाची चाचपणी:

पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्यामुळे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करुन औटघटकेचे खासदार झालेल्या राजेंद्र गावीत यांचे राजकीय जीवन धोक्यात आलेले आहे. त्यांना बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा चालू आहेत. परंतु राजेंद्र गावीत यांनी मात्र असा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. ही बातमी बहुजन विकास आघाडीकडूनच पेरण्यात आल्याचा राजकीय निरिक्षकांचा अंदाज असून त्यातून राजेंद्र गावीत व जनमताची चाचपणी केली जात असल्याचे मानले जाते. यासंदर्भात आमदार ठाकूर यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी योग्य वेळी योग्य ती माहिती सांगितली जाईल असे सांगून सस्पेन्स कायम राखला आहे.

एकंदरीतच २०१९ ची पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चूरशीची होणार असून हितेंद्र ठाकूर यांनी त्यात रंग भरण्यामध्ये आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments