वाडा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांविरोधात उपोषण

0
113
  • मनमानी व अकार्यक्षम कारभाराचा आरोप!
  • सत्ताधारी शिवसेना सदस्यांचीही जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

प्रतिनिधी/वाडा, दि. 18 : वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांच्यावर मनमानी व अकार्यक्षम कारभाराचा आरोप करत तसेच नगरपंचायतीच्या सामान्य तपासणी दरम्यान तपासणी अधिकार्‍यांनी मुख्याधिकारी मवाडेंवर ठेवलेल्या ठपक्यांच्या अनुषंगाने कारवाई व्हावी, या मागणीसाठी येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे निखिल भानुशाली व सामाजिक कार्यकर्ते अनंत सुर्वे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले.

वाडा नगर पंचायतीची स्थापना होऊन दीड वर्ष उलटले. सुरुवातीला प्रभारी मुख्याधिकारी म्हणून वाड्याचे तत्कालीन नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांच्याकडे चार-पाच महिने नगर पंचायतीचा कारभार होता. त्यानंतर प्रबोधन मवाडे यांची नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली. मुख्याधिकार्‍यांच्या नियुक्तीनंतर वाडा शहरातील मुलभूत विकासकामे झपाट्याने होतील, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना होती. परंतू या काळात एकही शासकीय योजना राबविली गेली नसल्याने नगर पंचायतीचा विकास खुंटला. त्यातच नागरिकांना कारवाईच्या नावाखाली धमकावून त्यांच्याकडून चिरीमिरी घेण्याचा सपाटा लावल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार वाडा उपविभागीय अधिकार्‍यांनी वाडा नगरपंचायतीची सामान्य तपासणी केली असता नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकार्‍यांची बरेच वेळा अनुपस्थिती, कार्यालयाच्या कामकाजातील ढिसाळपणा, नियोजनशून्य कारभार, कार्यालय प्रमुखाचे नियंत्रण नसल्याची व मुख्याधिकार्‍यांची शासकीय योजना राबविण्याची कुवत नसल्याचा तसेच अकार्यक्षम अधिकार्‍यामुळे जनमानसात शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र हा अहवाल येऊन तीन महिने उलटले असताना मुख्याधिकार्‍यांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा उपोषणकर्ते निखिल भानुशाली व अनंत सुर्वे यांनी दिला आहे.

दरम्यान वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी मवाडे यांचे निलंबन करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व वाडा नगर पंचायतीच्या रखडलेल्या योजना व सर्वांगीण विकासासाठी कायमस्वरूपी व अनुभवी कार्यक्षम मुख्याधिकारी देण्याची मागणी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांच्याशी संपर्क साधला असता नगरपंचायत प्रशासनातील अनेक पदे रिक्त असल्याने विकासकामे होऊ शकलेली नाहीत तसेच अनधिकृत बांधकामावर मी कारवाई करण्यासाठी नोटीसा पाठवल्याने अनेकांचे हितसंबंध दुखावले आहेत. त्यामुळे माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments