दिनांक 21 May 2019 वेळ 12:04 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

निवडणूक खर्च, अवैध मद्य विक्री, बँक व्यवहारांवर लक्ष- राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 17 : पालघर नगर परिषदेसाठी येत्या रविवारी (24 मार्च) मतदान होत असून निर्भय आणि मुक्त वातावरणात तसेच पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी दिली. निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे, अवैध मद्य विक्री तसेच बँकांच्या व्यवहारांवर यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे, असेही सहारिया म्हणाले.

निवडणुकीच्या तयारीबाबत सहारिया यांनी काल, शनिवारी पालघर येथे सर्व संबंधित अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक श्रीधर डुबे पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सहारिया यांनी निवडणूक कार्यक्रम तसेच प्रशासनाच्या तयारीबाबतची माहिती दिली. पालघर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह 14 प्रभागांतील 28 जागांसाठी एकूण 90 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. यासाठी 62 मतदान केंद्र तयार करण्यात आले असून मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे असे सांगतानाच निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे, अवैध मद्य विक्री, बँकांचे व्यवहार यावर यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. भरारी पथकांसह इतर सर्व पथके कार्यरत करण्यात आली आहेत व पोलीस यंत्रणाही दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी यासाठी माध्यमांचा सहभाग देखील मोलाचा असून मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी माध्यमांनी देखील प्रयत्न करावेत, असे आवाहन सहारिया यांनी केले. राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांच्या जबाबदार्‍याही महत्त्वाच्या असून प्रत्येक जण आपली जबाबदारी चोख पार पाडून प्रशासनाला निवडणूक सुरळीत पार पाडण्यास सहकार्य करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतल्यामुळे निर्भय आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी निवडणूक आयुक्तांना दिला. प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी सादरीकरणाद्वारे सुरू असलेल्या कामांबाबतची माहिती दिली. मतदार व उमेदवारांसाठी सुरू करण्यात आलेले अ‍ॅप तसेच फिरत्या वाहनांसह विविध माध्यमांद्वारे मतदारांमध्ये जागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top