दिनांक 22 September 2019 वेळ 4:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात रंगला पुरस्कार वितरण सोहळा!

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात रंगला पुरस्कार वितरण सोहळा!

  • कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाङ्मय पुरस्कारांचे वितरण
  • नाटककारही साहित्यिक असतो-प्रेमानंद गज्वी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 13 : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 2018-19 च्या वाङ्मयीन पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवारी ठाणे येथे मराठी ग्रंथ संग्रहालयात रसिक व लेखकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यंदाचा कोकण भूषण पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. अनंत देशमुख यांना देण्यात आला. तर कविता राजधानी पुरस्कार कोमसापचे केंद्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांना देण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व 10 हजार रुपये रोख असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. तसेच यावेळी वाड्.मयीन व वाड्.मयेतर पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.

हिराबाई पेडणेकर या चरित्र पुस्तकासाठी (आद्य महिला नाटककार) लेखिका शिल्पा सुर्वे यांना धनंजय कीर स्मृती प्रथम पुरस्कार तर उमाकांत वाघ यांच्या वळख या पुस्तकाला दुसरा श्रीकांत शेट्ये स्मृती चरित्र लेखन पुरस्कार देण्यात आला. उन्हाचे घुमट-कविता संग्रहाच्या लेखिका अनुजा जोशी व प्रशांत डिंगणकर यांच्या दगड कविता संग्रहाला दुसरा पुरस्कार मिळाला. विजया जंगले यांच्या मुक्या वेदना, बोलक्या संवेदना या ललित गद्य पुस्तकाला अनंत काणेकर स्मृती प्रथम पुरस्कार तर आर.एम. पाटील यांच्या आठवणीतील पानगळ साठवणीतील गुलमोहोर या पुस्तकाला दुसरा पुरस्कार देण्यात आला. भा.ल. महाबळ यांच्या ओळख कथासंग्रहाला वी.सी. गुर्जर स्मृती प्रथम पुरस्कार तर अरविंद हेब्बार यांच्या दरवळ कथा संग्रहाला विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार मिळाला. प्राचार्य किरण सावे यांचे चार्वाक दर्शन प्रासंगिकताः काल आणि आज या लेखनाला वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार, तर वैभव दळवी यांच्या समुद्रायनला पुरस्कार मिळाला. भाऊसाहेब वर्तक स्मृती पुरस्कार तारापूर येथील हरेश्वर सावे तसेच डहाणूतील डॉ. अंजली मस्करेहान्स, वीणा माच्छी, शांतीलाल ननावरे, कुमारी घरत (दांडेकर महाविद्यालय) सुरेखा कुरकुरे यांना कार्यकर्ता व अन्य पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी बोलतोना प्रमुख पाहुणे प्रेमानंद गज्वी म्हणाले, साहित्यिकाप्रमाणेच नाटककाराचे महत्व असते. त्याला समाजाने साहित्यिक म्हणूनच ओळख दिली पाहिजे. कोमसापचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कोमसापची स्थापना करुन साहित्यिकांची वाढ होण्यासाठी हे बीज लावले. तरीही अखिल भारतीय स्तरावर साहित्य संस्था त्याची दखल घेत नाहीत. या मराठी भाषेसाठी कार्य करणार्‍या संस्थेला मध्यवर्ती समितीची मान्यता का नाही? असा सवाल त्यांनी केला. मुळात मधु मंगेश कर्णिक हे बंडखोर साहित्यिक आहेत. त्यामुळे साहित्यिकांचे प्रश्‍न सुटण्यास मदत झाली. अर्थात साहित्यात लेखनाचे विविध प्रकार व इतर वादही खूप आहेत. परंतू येथे जमलेल्या पुरस्कारार्थी लेखकांनी देखील प्रयोगशील, मनोरंजन बोधी प्रकारात साहित्य लेखन सातत्याने करुन साहित्याचे ज्ञान समाजाला दिले पाहिजे. ते पुढे म्हणाले, खरेतर नाटसमिक्षा, कविता कार्यशाळा यांचीही नवोदित लेखकांना गरज असुन कविच्या जीवनात एक क्षण असा असतो की कविला कविता सुचते तो क्षण दैवी असतो. तो खूप महत्वाचा असतो.

आजच्या एकूणच राजकीय, सामाजिक वातावरणा विषयी बोलताना ते म्हणाले, सध्याचा काळ कठीण असला तरी एखादा क्षण असा येतो की राजकारणी आपल्या भूमिकेला न्याय देतात तो साहित्याचा विजय असतो. आपल्या अध्यक्षतेखाली नुकत्याचं पार पडलेल्या नाट्यसंमेलनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीचा अनुभव त्यांनी यावेळी कथन केला.

मधु मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षपदाकडून बोलताना ज्या साहित्य परिषदा राज्यात कार्यरत आहेत. त्यांनी 100 वर्षापूर्वीच्या कवी केशवसुत यांच्या मालगुंडमध्ये कोमसापने उभारलेल्या केशवसुत स्मारकाला भेट दिली नाही. आम्ही मात्र हे अद्वितीय स्मारक तीन वर्षात उभारले. केशवसुतांनी मराठी साहित्यात जे योगदान दिले व कोमसापने कोकणात साहित्यिकांसाठी सुरु केलेल्या कोमसापची ही कामगिरीच खुप बोलकी असल्याचे ते म्हणाले.

कोमसापचे उपाध्यक्ष व पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार प्राप्त डॉ. अनंत देशमुख व डॉ. महेश केळुस्कर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले. तर रसिकांमध्ये उपस्थित असलेले कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे यांनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी कार्याध्यक्षा नमिता कीर, विश्वस्त आर. एम. पाटील, माजी न्यायमूर्ती भास्करराव शेटपे, अरुण नेरुरकर व रेखा नार्वेकर व्यासपिठावर उपस्थित होते. केंद्रीय कार्यवाह शशिकांत तिरोडकर, माधव अंकलगे यांनी संयोजन केले. प्रशांत डिंगणकर यांनी आभार मानले.

comments

About Rajtantra

Scroll To Top