दिनांक 21 May 2019 वेळ 12:03 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाड्यात पाणी टंचाईचा वैशाख वणवा भडकला!

मोखाड्यात पाणी टंचाईचा वैशाख वणवा भडकला!

  • टंचाईग्रस्त गावांनी गाठली पन्नाशी
  • जुजबी उपाययोजनांवर भर

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : मागील वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे मोखाड्यात यंदा डिसेंबरच्या मध्यापासून म्हणजे दोन महिने अगोदरच पाणी टंचाईला सुरूवात झाली असुन सध्यस्थितीत मोखाड्यातील 46 गाव-पाड्यांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गाव-पाड्यांमध्ये 15 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर आणखी 4 गाव-पाड्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केल्याने मार्चच्या पहिल्याच आठवड्यात टंचाईग्रस्त गाव-पाड्यांनी पन्नाशी गाठल्याचे चित्र आहे. तसेच पाणी टंचाईची ही दाहकता दिवसागणिक वाढणार असुन दरवर्षीप्रमाणे यंदाही टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या शतक पार करणार आहे. परिणामी या भागातील आदिवासींना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मोखाड्यातील पाणी टंचाई ग्रस्त गाव-पाड्यांची संख्याही वाढू लागली आहे. गतसाली सरासरीच्या सुमारे 700 मी. मी. पाऊस कमी झाला आहे. तर परतीच्या पावसानेही दडी मारल्याने त्याचा परिणाम म्हणून दोन महिने अगोदर पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. डिसेंबरच्या पंधरवड्यात गोळीचापाडा, धामोडी, दापटी, धामणी, स्वामीनगर, कुंडाचापाडा, शास्रीनगर, भोवाडी, कुडवा, बिवलपाडा, आसे, वारघडपाडा, गवरचरीपाडा आणि पेंडक्याची वाडी येथे सुरू झालेल्या टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या आता 46 वर पोहोचली असून चास, वांगणपाडा, नावळ्याचापाडा आणि गुंबाडपाडा या चार गावांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली आगे. त्यामुळे टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात पन्नाशीला भिडली आहे.

दरम्यान, टंचाईग्रस्त गावांमधील विहिरीत पाणी टाकण्यासाठी टँकर येताच, पाणी मिळविण्यासाठी महिला, पुरुष, लहान मुले एकच गर्दी करतात. पर्यायाने अपघातांनाही निमंत्रण दिले जाते. यात चेंगरा-चेंगरी, विहिरीत पडणे असे प्रकार घडल्याचेही उदाहरणे आहेत.

दुसरीकडे पानी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी हंगामी व जुजबी उपाययोजनांवरच भर दिला जात असल्याने मागील अनेक वर्षांपासून तिच ती गावे पाणी टंचाईच्या आराखड्यावर आजही ठाण मांडून आहेत. त्यात घट होण्याऐवजी पाणी टंचाईचा आलेख उंचावतच आहे. उन्हाची तीव्रता वाढत जाणार तशी टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्याही वाढणार आहे. गतसाली 78 गाव-पाड्यांना 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. मात्र, यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात टंचाई ग्रस्त गाव-पाड्यांची संख्या 50 झाल्याने, यंदा ही संख्या शतक पार करणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी वरिष्ठ पातळीवरून त्याबाबत कायम उपाययोजना होत नसल्याने दुर्दैवाने मोखाडा वासियांना कायमच पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.

* दुष्काळग्रस्त तालुका केवळ कागदावरच!

शासनाने जव्हार व मोखाडा ही दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामुळे येथे टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची पाण्याची मागणी येताच 48 तासात पाणी पुरवठा सुरू करणे आवश्यक आहे. मात्र टंचाईग्रस्त इतर 4 गाव-पाड्यांकडून मागणी होऊन दहा दिवसांहुन अधिकचा कालावधी उलटुनही येथे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याचे कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुका जाहीर होऊनही, तो केवळ कागदावरच राहिला असुन आवश्यक उपाययोजनांची अंमलबजाणी होत नसल्याने आदिवासींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

अनेक गाव-पाड्यांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी होत आहे. तसेच उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे टंचाई ग्रस्त गाव-पाड्यांची संख्या शंभरावर जाण्याची शक्यता आहे.
-संगिता भांगरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोखाडा

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top