दिनांक 21 May 2019 वेळ 12:20 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » धनगरांना दिलेल्या सवलतींविरोधात आदिवासी आक्रमक!

धनगरांना दिलेल्या सवलतींविरोधात आदिवासी आक्रमक!

रॅली काढून व ठिय्या आंदोलन करत केला निषेध

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 10 : शासनाने धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयाला अनेक आदिवासी संघटनांचा विरोध आहे. या निर्णयामुळे धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी केल्याची भावना आदिवासींमध्ये असुन याविरोधात मोखाड्यातील आदिवासी समाज संघटनेने आक्रमक होऊन, खोडाळा बाजारपेठेत निषेध रॅली काढली होती. तसेच बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवून शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला आहे.

आदिवासी समाज संघटनेच्या खोडाळा शाखेचे अध्यक्ष उमाकांत हमरे (बाबा) यांच्या नेतृत्वाखाली खोडाळा बाजारपेठेत निषेध रॅली काढण्यात आली होती. खोडाळ्याचे सरपंच प्रभाकर पाटील, माजी उप सभापती एकनाथ झुगरे, सदाशिव ईधे, संजय साळवे, संदिप थाळेकर, भगवान सावर, काळू भोई, शिवा गोडे, संदीप पाटील, शरद शिद आदी कार्यकर्त्यांसह शेकडो आदिवासी या निषेध रॅलीत सहभागी झाले होते. तसेच खोडाळ्यातील इंदिरानगर येथील नाग्या कातकरी समाजमंदिरात शेकडो आदिवासींनी एकत्र येत बाजारपेठेतुन या निर्णयाच्या निषेधाचे फलक झळकावुन धनगर समाजाला दिलेल्या सवलती विरोधात घोषणा दिल्या. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन मोर्चेकर्‍यांनी परिसर दणाणून सोडला होता. धनगर समाज आदिवासी समाजात घुसखोरी करत असुन शासनाने आमच्या सवलती धनगरांना देऊन आमच्या हक्कावर गदा आणली असल्याचा आरोप मोर्चेकर्‍यांनी यावेळी केला.

सरकारच्या या निर्णयाविरोधात आदिवासी समाज संघटनेने खोडाळा बाजारपेठ बंद ठेवण्याची हाक देखील दिली होती. त्याला प्रतिसाद देत आठवडे बाजार असतानाही खोडाळा बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

दरम्यान, निषेध रॅली बसस्थानकाजवळील शिवाजी चौकात आली असताना तहसील कार्यालयातील अधिकारी वेळेवर निवेदन स्विकारण्यास न आल्याने संतापलेल्या मोर्चेकर्‍यांनी शिवाजी चौकातच ठिय्या मांडून निषेधाच्या घोषणा दिल्या. सुमारे तासभर केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे आठवडे बाजारासाठी, बाजारहाट करण्यासाठी आलेल्या बाजारकरूंचे मात्र हाल झाले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top