दिनांक 21 May 2019 वेळ 12:07 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांचे वाटप!

आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांचे वाटप!

वनपट्ट्यांसह आदिवासींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणाचा प्रयत्न -मंत्री विष्णू सवरा

प्रतिनिधी/डहाणू, दि. 10 : जिल्ह्यातील आदिवासी बांधव वर्षानुवर्षे अती दुर्गम भागातील वन विभागाच्या शासकीय जमिनी कसत आला आहे. अशा आदिवासी बांधवांना काल, शनिवारी वन मित्र मोहिमे अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. सकाळी 12 वाजता एच. एम. पी. शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा उपस्थित होते. तर जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, आमदार पास्कल धनारे व विलास तरे, वनहक्क आढावा समितीचे प्रमुख विवेक पंडित, माजी खासदार बळीराम जाधव, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, डहाणूचे उप वनसंरक्षक भिसे, जव्हारचे उप वनसंरक्षक मिश्रा यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (बल हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारीत नियम 2012 च्या अनुषंगाने आदिवासी बांधवांना या वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रास्ताविक करताना उपजिल्हाधिकारी (सामान्य) डॉ. किरण महाजन यांनी वनपट्टे मंजुरीच्या कामाची माहिती दिली. जिल्ह्यात एकूण 44,384 वैयक्तिक दावे मंजूर करण्यात आले असून त्यांचे क्षेत्र 55,957 एकर इतके आहे. तर 441 सामूहिक दाव्यांना 70,653 एकर क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यात वनमित्र मोहीम राबवून 14,598 दावे हाताळण्यात आले ज्यापैकी 9,357 दावे मंजूर करण्यात आले आहेत. आता विभागीय पातळीवर केवळ 2,934 दावे शिल्लक असून एकूण मंजूर दाव्यांपैकी 8838 दावे जिल्हा पातळीवर अपिलात प्रलंबित आहेत. ते देखील लवकरात लवकर निकाली काढले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी पालघर जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी काम करता येणे हे माझे सौभाग्य आहे असे सांगतानाच वनपट्टे वाटपाबरोबरच कातकरी उत्थान अभियानांतर्गत 573 कातकरींना जागा देण्यात येणार असुन त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हक्काकडून सक्षमतेकडे हे ब्रीद नजरेसमोर ठेवून वनपट्टे धारकांना काही वर्षांत उत्पन्नाचे साधन निर्माण होईल, अशा फळबाग लागवडीच्या योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचेही डॉ. नारनवरे म्हणाले. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जमीन मिळवून देणे हे ध्येय बाळगून यापेक्षाही अधिक चांगले काम करून दाखवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अध्यक्ष पदावरून बोलताना मंत्री सवरा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आदिवासींना वनपट्ट्यांचे वाटप होत आहे हा ऐतिहासिक दिवस आहे. आदिवासींना केवळ वनपट्ट्यांचे वाटप करून शासन थांबणार नाही तर त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत जमिनीचे सपाटीकरण, कुंपण, विहीर, ऑईल इंजिन, पाईपलाईन आदी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सवरा पुढे म्हणाले, वन हक्कांबाबतचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच राज्याच्या एक तृतीयांश इतक्या मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्याने वनपट्टे मंजुरीचे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र लाभार्थ्यांना कमीत कमी एक एकर जमीन मिळालीच पाहिजे अशी भूमिका घेतली आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ होताना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी रात्रंदिवस हिरीरीने काम करून आपली भूमिका चोखपणे पार पडल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह सर्वांचे अभिनंदन केले.

माजी खासदार जाधव यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना विश्वासात घेऊन आदिवासींना न्याय दिल्याची भावना व्यक्त केली. तसेच आमदार तरे यांनी राज्यातील सर्वात मोठे काम पालघर जिल्ह्याने केल्याबद्दल अभिनंदन करून प्रलंबित दावे लवकर निकाली काढावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आमदार धनारे यांनी आदिवासी समाजाची मोठी मागणी आज पूर्ण होत असल्याबाबत समाधान व्यक्त करून आदिवासी कसत असेल तेवढी जागा त्याच्या नावावर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पंडित यांनी पालघर जिल्ह्यात राज्याच्या एक तृतीयांश प्रमाणात वनपट्टे वाटप होणे हे वन हक्क कायदा आणि त्याची योग्य अंमलबजावणी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे शक्य झाल्याचे सांगितले. प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

या प्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 5 लाभार्थ्यांना वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह वनपट्टे मंजुरी प्रकरणी उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यातील सर्व अधिकार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आमच्या प्रतिनिधीने लाभार्थ्यांशी संवाद साधला असता लाभार्थी लक्ष्मण हरी पांढरे (रा. हालोली, दहीसर), कमळाकर शिडवा गिंभल (रा. वेहेलपाडा, ता. विक्रमगड) व ननकु सखाराम बसवत (रा. वणई ता. डहाणू) यांनी आनंद व्यक्त करुन पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या लढ्याला आज खर्‍या अर्थाने यश मिळाल्याची भावना व्यक्त केली.

  • दरम्यान, डहाणू येथील अशोक राजपूत यांनी त्यांच्या कन्येच्या नुकत्याच झालेल्या विवाहामध्ये आहेर स्वरूपात आलेल्या एक लाख 73 हजार रुपये रकमेचा धनादेश पुलवामातील शहीदांच्या कुटुंबियांसाठी यावेळी पालकमंत्र्यांकडे सुपूर्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार रेवणनाथ लबडे यांनी केले, तर डहाणूचे तहसीलदार राहूल सारंग यांनी आभार मानले. कार्यक्रमास आदिवासी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top