दिनांक 20 May 2019 वेळ 11:54 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » चिल्हार येथे स्फोटकांनी भरलेल्या दोन वाहनांवर कारवाई!

चिल्हार येथे स्फोटकांनी भरलेल्या दोन वाहनांवर कारवाई!

मोठ्या प्रमाणावर जिलेटीन कांड्यांचा साठा जप्त

वार्ताहर/बोईसर, दि. 8 : गुजरात राज्यातून बेकायदेशीररित्या स्फोटकांचा साठा घेऊन मनोरमधील नागझरी येथे निघालेल्या दोन वाहनांवर पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने कारवाई करत दोन्ही वाहनांसह मोठ्या प्रमाणावर जिलेटीन स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. गेल्या चार महिन्यांपासुन अशाप्रकारे चोरट्या पद्धतीने दगड खाणींसाठी स्फोटकांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

बोईसर पुर्वेकडील नागझरी, लालोंडे, निहे, किराट, गुंदले या भागात मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत. या खाणींमध्ये दगड फोडण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जातो. त्यामुळे येथील खाण माफियांना गुजरात राज्यातून बेकायदेशीररित्या जिलेटीन स्फोटकाचा पुरवठा केला जात होता. तर गेल्या चार महिन्यांपासुन या भागात जिलेटीन स्फोटकाचा बेसुमार पुरवठा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. तीन दिवसांपुर्वी नागझरी येथे जिलेटीन स्फोटात एक युवकाचा मृत्यू झाल्यानंतर नागझरी भागात होणारा बेकायदेशीर जिलेटीन पुरवठ्याचा विषय चव्हाट्यावर आला होता. यावर कारवाई म्हणून पालघर पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनुसार पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार येथे स्फोटकाने भरलेल्या दोन वाहनांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणावर जिलेटीन कांड्यांचा साठा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेली ही स्फोटके निहे येथील एका दगडखाणीत नेली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

नागझरी भागात काही दगडखाण मालकांकडे जिलेटीन वापराबाबत परवाने आहेत. तर परवाने नसलेल्या दगडखाण मालकांनी गुजरात येथील एका ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने स्फोटके पुरविण्याचा ठेका दिला आहे. या भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर दगडखाणींमध्ये स्फोट करण्यासाठी दगडखाण माफिया चोरट्या पध्दतीने जिलेटीन व डेटोनेटरची तस्करी करत असतात. दरम्यान, काही महिन्यांपुर्वी मनोर येथील एका घरातून मोठ्या प्रमाणावर जिलेटीन कांड्या व डेटोनेटरचा साठा पोलीसांनी जप्त केला होता.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top