दिनांक 21 May 2019 वेळ 12:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » धोकादायक इमारतीच्या दुरूस्तीसाठी लाखोंचा खर्च, शासनाच्या पैशांची उधळपट्टी

धोकादायक इमारतीच्या दुरूस्तीसाठी लाखोंचा खर्च, शासनाच्या पैशांची उधळपट्टी

प्रतींनिधी/वाडा, दि. 6 : वाडा पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारत गेल्या 50 ते 60 वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून आता या इमारतीचा एक एक भाग निखळून इमारत धोकादायक बनली आहे. मात्र याच इमारतीची वर्षानुवर्षे डागडुजी करून तिच्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याने शासनाच्या पैशांची एकप्रकारे उधळपट्टी केली जात असल्याची चर्चा नागरिकांत आहे. आवश्यकता असताना नविन इमारत बांधण्याऐवजी त्याच इमारतीवर लाखोंचा खर्च केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाडा पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारत गेल्या 50 ते 60 वर्षापूर्वी बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यांची स्वतंत्र दालने असून विविध खात्याचे खाते प्रमुख व कर्मचारी अशी व्यवस्था आहे. तळमजला अधिक एक मजला अशी या इमारतीची रचना असुन तळमजल्यावर सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन व महिला बालकल्याण विभागाची तर पहिल्या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम व लघुपाटबंधारे विभाग अशी कार्यालये आहेत. तसेच या इमारतीचा काही भाग वाढवून शिक्षण विभाग व पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांसाठी बसण्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र आता ही इमारात जिर्ण झाल्याने इमारतीचा एक-एक भाग निखळत चालला आहे. काही भागाचा स्लॅब निखळल्याने त्यातील लोखंड लांबून दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपूर्वी जिन्यावरील स्लॅब कोसळून एका नागरिकाच्या अंगावर पडल्याने तो जखमी यात झाला होता.

पावसाळ्यात या इमारतीत पाण्याची गळती होत असते. त्यामुळे छपरावर प्लॅस्टिकचे आवरण आच्छादून तसेच कागदपत्रांचा बचाव करण्यासाठी कर्मचार्‍यांना टेबल खुर्च्या इतरत्र हलवून काम करावे लागत आहे. विशेष म्हणजे या इमारतीचे स्ॅट्रक्चरल ऑडिट केल्याने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. असे असतानाही यावर्षी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 20 लाखाचा निधी मंजूर झाला असून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरूस्तीत छपरावरील पत्रे, तुटलेल्या भागाची दुरूस्ती, प्लॅस्टर, सिलिंग आदी दुरूस्तींचा समावेश आहे.

विशेषतः मुख्य इमारत मोडकळीस व धोकादायक बनल्याने लाखो रुपये खर्चून अंतर्गत मुलामा व वरवर डागडुजी करून यातून काय साध्य होणार आहे? कि शासनाचा निधी लाटण्यासाठी अधिकार्‍यांच्या संगनमताने ठेकेदारांची व अधिकार्‍यांची खळगी भरण्यासाठी हा खर्च केला जात आहे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

वाडा पंचायत समितीच्या इमारतीचा प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे आला होता. मात्र जागे अभावी प्रस्तावित इमारत होऊ शकत नाही. जागेचा प्रश्‍न मार्गी लागताच नविन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल.
-एस.एल.कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पालघर

इमारत धोकादायक असली तरी कर्मचा-यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने, आहे त्याच इमारतीची दुरूस्ती करण्यात येत आहे. नविन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून अद्याप मंजूरी मिळालेली नाही.
-धनंजय जाधव, उपअभियंता, पंचायत समिती बांधकाम विभाग, वाडा

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top