दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दिल्ली दौरा, भारतीय संविधानाशी निगडित आस्थापनांचा केला अभ्यास

0
15

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाशी निगडित असलेल्या महत्वाच्या आस्थापनांची ओळख व त्यांच्या कामकाजाविषयी प्रात्यक्षिक माहिती व्हावी या उद्देशाने पालघर येथील सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथे अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते.

24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आयोजित या दौर्‍यादरम्यान विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाला भेट देऊन न्यायालयाचे काम जवळून पाहता आले. विद्यार्थ्यांसाठी आपल्या आयुष्यातील हा अविस्मरणिय क्षण होता. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील संग्रहालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना विविध ऐतिहासिक खटल्यासंदर्भातील बाबींची माहिती घेता आली. यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली आणि तिथले कामकाज समजावून घेतले. सामान्यातला सामान्य माणूस राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची मदत घेऊन अन्यायाविरुद्ध कसा लढू शकतो याची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. सरकारी वकिल, न्यायाधीश आणि इतर न्यायालयीन अधिकार्‍यांना त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी मदत करणार्‍या ज्युडिशिअल अ‍ॅकॅडमीलाही विद्यार्थ्यांना या दौर्‍यात भेट देता आली.

तसेच ज्या सभागृहात कायद्याचा जन्म होतो अशा लोकसभा व राज्यसभा या भारताच्या लोकशाहीमध्ये महत्वाचं स्थान असलेल्या दोन्ही सभागृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांना तेथील आसन व्यवस्था कशी असते आणि कायदे कशाप्रकारे पटलावर मांडले जातात याविषयी देण्यात आली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनासाठी आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी वापरण्यात येत असलेला ऐतिहासिक सेंट्रल हॉल, तसेच राष्ट्रपती भवनातील विविध सभागृहांचे दर्शनही विद्यार्थ्यांना घेता आले.

या अभ्यास दौर्‍याची सांगता झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक ताजमहाल आणि लाल किल्ला या वास्तूंना भेट दिली. यावेळी लाल किल्ल्यासमोर असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा पाहताच विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र या गीतावर ठेका धरत दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ही भावना जागृत केली.

भारताच्या वायुदलाने जैश ए मोहम्मदच्या तळावर हल्ला केल्याच्या दुसर्‍या दिवशीच विद्यार्थ्यांना इंडिया गेट आणि अमर जवान ज्योतीचे दर्शन घ्यायची संधी मिळाली. त्या देश प्रेमाने भारावलेल्या वातावरणात इंडियागेटला भेट देता आल्याने विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालय प्रशासनासाठी कृतज्ञतेची भावना होती.

या अभ्यास दौर्‍यात विधी शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाचे मिळून एकूण 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पायल चोलेरा यांनी दौर्‍याचे नियोजन केले होते. त्यांच्यासोबत अ‍ॅड. दिशा तिवारी व अ‍ॅड. उत्कर्षा जुन्नरकर यांनी विद्यार्थ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केले.

Print Friendly, PDF & Email

comments