प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचे जिल्हास्तरीय उद्घाटन

0
17

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : असंघटित कामगारांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर कमीतकमी तीन हजार (3,000) रुपये पेन्शन म्हणून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असुन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या माध्यमातून कामगारांना हा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचे राष्ट्रीय स्तरावर उद्घाटन आज, मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात राज्यातील गांधीनगर येथून करण्यात आले. तर आज एकाच वेळी पालघर जिल्ह्यातही या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेसाठी जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

पालघर जिल्ह्यात असंघटित कामगार मोठ्या संखेने आहेत. त्यानुसार सर्व यंत्रणांनी समन्वय साधून शेवटच्या लाभार्थीपर्यंत ही योजना पोहचविण्यासाठी तत्परतेने कार्य करावे. तसेच गरजू लाभार्थींपर्यंत या योजनेची माहिती पोहचविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहाय्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले. तर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटीत कामगारांच्या आयुष्यात दुरगामी परिणाम करणारी योजना आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी यावेळी व्यक्त केले. असंघटित कामगार जसे रिक्षा चालक, फेरीवाले, मिड-डे मील कामगार, माथाडी कामगार, शेती काम करणारे मजूर, घर काम करणारे कामगार हे शरीर सुदृढ असे पर्यंत काम करतात. परंतु आजारपण किंवा शारिरीक तक्रारींमुळे त्यांच्या रोजंदारीवर परिणाम होतो व त्यांना अनेक आर्थिक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी पेन्शन मिळाल्याने मोठ्या प्रमाणात अशा कामगारांना आधार मिळणार आहे, असे बोरीकर म्हणाले.

असंघटीत काम करणारे 18 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्ती, तसेच ज्यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजारांपेक्षा कमी असेल अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून दिली. तसेच राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व रोजगार कार्यालय, एलआईसीचे सर्व शाखा कार्यालय तसेच ईएसआईसी/ईपीएफओच्या सर्व केंद्रात लाभार्थींना या योजनेबाबत संपूर्ण माहिती मिळू शकेल, असेही त्यांनी सांगतिले.

यावेळी प्रासंगिक स्वरुपात जिल्ह्यातील निवडक लाभार्थींना त्यांचे नोंदणीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या राष्ट्रीय उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

यावेळी सहआयुक्त (कामगार) नम्रता पाटील, कर्मचारी राज्य बिमा निगमचे पंकज कुमार, जिल्ह्यातील अधिकारी वर्ग व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments