दिनांक 20 May 2019 वेळ 11:54 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » स्फोटकाच्या साहाय्याने मासेमारी, जिलेटीन स्फोटात तरुण ठार

स्फोटकाच्या साहाय्याने मासेमारी, जिलेटीन स्फोटात तरुण ठार

वार्ताहर/बोईसर, दि. 03 : पालघर तालुक्यातील नागझरी गावच्या हद्दीतील सूर्या नदीत शुक्रवारी सायंकाळी स्फोटकांच्या साहाय्याने मासेमारी करताना एका तरुणाचा मृत्यू झाला. गणेश बाळू वणगा (वय 23) असे सदर तरुणाचे नाव असून नागझरीच्या तांबडी पाड्याचा तो रहिवासी होता.

सूर्या नदी पात्रात शुक्रवारी 4 वाजताच्या सुमारास स्फोटकांच्या साहाय्याने मासेमारी करीत असताना स्फोटक हातातच फुटल्याने गणेश गंभीर जखमी झाला होता. या भयंकर स्फोटात गणेशचा एक हात धडावेगळा झाला, तर त्याच्या तोंडाला, छातीला, पोटाला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर जखमा झाल्या. मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी वसई येथील प्लॅटिनम हॉस्पिलमधे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. यानंतर मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी मनोर पोलीस स्टेशनला अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकरे करीत आहेत.

नागझरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात दगडी खदाने असुन येथे दगड फोडण्यासाठी जिलेटीन कांड्या तसेच इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सचा वापर केला जातो. या खदानींमध्ये काम करणार्‍या कामगारांकडून चोरी छुप्या पद्धतीने या जिलेटीन कांड्या तसेच डिटोनेटर्स पळवले जातात व नदीपात्रात त्याचा स्फोट घडवून मासेमारी केली जाते. डिटोनेटर्स कापून ते जिलेटीन कांडीमध्ये टाकून व त्यामध्ये वात टाकून वातीला विडीच्या सहाय्याने पेटवून सदर स्फोटक नदी पात्रात फेकले जाते. स्फोट लवकर व्हावा म्हणून वात छोटी ठेवली जात असल्याने 100 टक्के जीवाचा धोका पत्करून अशाप्रकारे मासेमारी केली जाते. गेल्या काही वर्षांत हा प्रकार नदीकाठी सर्रासपणे दिसून येत असून यामध्ये अनेकांनी आपले हात, हाताची बोटं तसेच काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर निर्बंध यावा म्हणून नदीकाठच्या काही गावांनी अशा प्रकारे मासेमारी करणार्‍यांवर गुन्हा नोंदविण्याची नियमावली केली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top