दिनांक 21 January 2020 वेळ 4:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » लोकसहभागातून पालघर येथे येत्या 3 मार्च रोजी महाआरोग्य शिबीर, आरोग्य तपासणी करा, पालकमंत्री विष्णू सवरा यांचे आवाहन

लोकसहभागातून पालघर येथे येत्या 3 मार्च रोजी महाआरोग्य शिबीर, आरोग्य तपासणी करा, पालकमंत्री विष्णू सवरा यांचे आवाहन

राजतंत्र, प्रतिनिधी
पालघर, दि. 27- पालघर येथे येत्या तीन मार्च रोजी आयोजित केले जाणार असलेल्या महाआरोग्य शिबिरात जिल्ह्यातील विशेषत: आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध होणार आहेत.

या शिबिरासाठी जिल्ह्यातील सर्व घटकांचा लाभत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता शासकीय निधीचा वापर न करता लोकसहभागातूनच हे शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे हित लक्षात घेता या शिबिरासाठी सर्व घटकांनी यापुढेही असेच मोलाचे सहकार्य करावे तसेच या संधीचा लाभ घेऊन जिल्ह्यातील सर्व रहिवाशांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील रहिवाशांची मुंबईतील विविध तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर अत्यावश्यक असणाऱ्या शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार आहेत. त्यामुळे समाजाचे आपण काही देणे लागतो या उदात्त हेतूने या सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी विविध सेवाभावी संस्था तसेच खाजगी कंपन्या देखील पुढे येत आहेत. त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या आरोग्य शिबिरासाठी लागणारा खर्च केला जाणार आहे. त्याचबरोबर खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री पास्कल धनारे, निरंजन डावखरे आदींसह अन्य लोकप्रतिनिधी या शिबिरासाठी मंडप, जेवण, पाणी, बिस्किट आदी सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

जिल्ह्यातील विविध कंपन्यांबरोबरच ‘इस्कॉन’चे देखील यासाठी सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रूग्णसेवेसाठी सर्वांनी सोबत यावे-वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

पालघर येथे 3 मार्च रोजी होत असलेले भव्य महाआरोग्य शिबिर हे शासनाच्या वतीने आयोजित केले जाणारे 30 वे शिबिर आहे. रूग्णांची तपासणी आणि उपचार मोफत केले जाणार असल्याने यापुर्वीच्या शिबिरांना देखील मोठा लोकसहभाग लाभला होता. पालघर येथे देखील लोकप्रतिनिधी, विविध अशासकीय संस्था, खाजगी कंपन्या पुढाकार घेत असल्याने शासनाचा निधी खर्च न करता हे अभियान राबविले जाणार आहे. रूग्णसेवा लक्षात घेता समाजातील सर्व घटकांनी या आयोजनात हातभार लावून हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. शहरी व ग्रामीण भागातील गरीब व गरजू रूग्णांना जिल्ह्यातच मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर येथे ‘अटल आरोग्य महाशिबिराचे’ आयोजन करण्यात येत आहे. आदिवासी विकास मंत्री तसेच पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या निर्देशानुसार हे शिबिर शासकीय निधीचा वापर न करता लोकसहभागातून आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली. हे शिबिर आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय, मुंबई आणि पालघर जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयोजित केले जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top