दिनांक 20 May 2019 वेळ 11:56 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर महाविद्यालय परिवर्तन वक्तृत्व स्पर्धा संपन्न!

दांडेकर महाविद्यालय परिवर्तन वक्तृत्व स्पर्धा संपन्न!

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 22 : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि नवनीतभाई शाह परिवर्तन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुंबई, कल्याण, बदलापूर, वाडा, विरार, वसई, बोर्डी, मुरबाड, उत्तन, मिरारोड, चिंचणी व पालघर अशा विविध भागातील महाविद्यालयामधून स्पर्धक सहभागी झाले होते.

महिला विटाळ: भूतकाळ की वर्तमान या विषयावर परखड मत व्यक्त करणार्‍या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या सुप्रिम मस्कर याने या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले. महिला विटाळ हा मानवतेला कलंक असून आपल्यासारख्या नव्या पिढीने या बाबींचा साकल्याने विचार केला पाहिजे. आपण आधुनिक, विज्ञानवादी झालो असलो तरी धार्मिकतेच्या रूढींच्या बेड्या आपल्या पायात घट्ट रूतून बसल्या आहेत हे समकालीन दाखले देत विवेचन केले. स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक राम नारायण रूईया महाविद्यालयाच्या श्रेयस सनगरे या विद्यार्थ्याने पटकावले. आदिवासी विकासाचे वास्तव या विषयावर त्याने मुद्देसूद विवेचन केले. तर तृतीय पारितोषिक पटकावणार्‍या बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयाच्या वैभव बोराडे या विद्यार्थ्याने मोबाईल माझा सांगाती या विषयावर विचार मांडताना निर्माणकर्ता हा निर्मित वस्तू नियंत्रित करतो तोवर ठीक आहे, मात्र जेव्हा एखादी निर्मिती निर्माणकर्त्याला नियंत्रित करू लागते तेव्हा ते हानीकारक असते, असा मुद्दा मांडून आपले वक्तृत्व सादर केले. उत्तेजनार्थ पारितोषिक वाडा महाविद्यालयाच्या कुणाल ठाकरे या विद्यार्थ्याने पटकाविले.

दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या विशेष पारितोषिकामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा स्पर्धेतील सहभागाचा टक्का यंदा वाढलेला दिसला. पालघरच्या विधी महाविद्यालयाच्या मिलिंद बामणे या विद्यार्थ्याला हे विशेष पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धेतील पाच विषयांपैकी समाज संशोधन आणि तरूण या विषयाला कोणत्याही स्पर्धकांनी स्पर्श न करण्यातून संशोधनाबद्दल तरूणांमध्ये असलेली अनास्था व अनभिज्ञता समोर आली.

स्पर्धेच्या उद्घाटनास संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर, प्राचार्य डॉ. किरण सावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष धनेशभाई वर्तक आणि धराधर पाटील उपस्थित होते. तसेच परिवर्तन ट्रस्टचे अध्यक्ष रमाकांत पाटील आणि सदस्य विनोद पाटील यांनी सहभागी स्पर्धकांशी वक्तृत्व नेमके कसे असावे या विषयावर संवाद साधला. स्पर्धेचे समन्वयक म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. विवेक कुडू यांनी काम पाहिले.

स्पर्धेचे परीक्षण पी. एल. श्रॉफ महाविद्यालयाचे प्रा. ज्ञानेश्वर भोसले, मालाडच्या अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. स्मिता पाटील व सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रा. दर्शना चौधरी यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनात प्रा. निलेश पाटील व विद्यार्थी नील मेहता, जया धोडी, अर्पिता किणी, प्रगती पाटील यांचे सहकार्य लाभले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top