दिनांक 30 May 2020 वेळ 7:42 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » कोमसाप पुरस्कार : डॉ. अनंत देशमुख कोकण साहित्य भूषण, तर डॉ. महेश केळुसकरांना कविता राजधानी पुरस्कार

कोमसाप पुरस्कार : डॉ. अनंत देशमुख कोकण साहित्य भूषण, तर डॉ. महेश केळुसकरांना कविता राजधानी पुरस्कार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मुंबई, दि. 20 : कोकण मराठी साहित्य परिषदेचे 2018-19 चे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार आज मुंबईत पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी जाहीर केले. ज्येष्ठ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल कोकण साहित्य भूषण या सन्मानाने गौरविण्यात येणार असून निद्रानाश या नव्या कवितासंग्रहासाठी महेश केळुसकर यांना कविता राजधानी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकी 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या साहित्यावर दोन तासांचा जाहीर कार्यक्रम असे या दोन पुरस्कारांचे स्वरुप आहे.

डॉ. अनंत देशमुख

श्री. पु. भागवत, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, गुरुनाथ सामंत, डॉ. गंगाधर पाटील आदी दिग्गज साहित्यिकांना यापूर्वी कोकण साहित्य भूषण सन्मान प्राप्त झालेला असून या मांदियाळीत आपला समावेश होत असल्याबद्दल संकोच आणि समाधान अशी संमिश्र भावना डॉ. अनंत देशमुख यांनी व्यक्त केली. समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांचे आठ खंडातील चरित्र लिहून डॉ. देशमुख यांनी मराठी साहित्यात मोठी ठळक कामगिरी केली आहे. श्रीधर बळवंत टिळक, रँग्लर परांजपे, वि. द. घाटे यांची चरित्रेही देशमुखांच्या लेखन कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे आहेत.

महेश केळुसकर

महत्त्वाचा कवी म्हणून अखेर कोमसापने आपली दखल घेतल्याबद्दल, कोमसापचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी आपल्या मिश्किल शैलीत समाधान व्यक्त केले. गेली 28 वर्षे आपण कोमसापमध्ये काम करतोय, पण हा पहिलाच घरचा पुरस्कार सन्मानाने देण्यात येतोय म्हणून आनंद झालाय, असे ते पुढे म्हणाले. प्रखर राजकीय व सामाजिक जाणीवेची, समकाळाची तल्खली व्यक्त करणारी बहुपेडी कविता हे निद्रानाश (मौज प्रकाशन) या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य असून मराठी कविताविश्वात या संग्रहाची सध्या विविध स्तरांमध्ये चर्चा आहे. सौमित्र, दासू वैद्य, अनिल धाकु कांबळी, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, नीरजा आदी कवी-कवयित्री यापूर्वी कविता राजधानी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

दरम्यान, कोकण साहित्य भूषण सन्मानप्राप्त लेखक आणि कविता राजधानी पुरस्कार प्राप्त कवींची छायाचित्रे, वाङ्मयीन कारकीर्द माहिती आणि निवडक कविता व साहित्यांस कोमसापच्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुलातील नव्या साहित्य दालनात प्रदर्शित करण्यात येईल, असे केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी जाहीर केले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top