दिनांक 21 May 2019 वेळ 12:22 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पुलवामा दहशतवादी हल्ल्याविरोधात बोईसरमध्ये उत्स्फूर्त बंद!

पुलवामा दहशतवादी हल्ल्याविरोधात बोईसरमध्ये उत्स्फूर्त बंद!

वार्ताहर/बोईसर, दि. 17 : काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणुन समाज माध्यमांद्वारे काल, शनिवारी पुकारण्यात आलेल्या बंदला बोईसरमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. तर पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद दिसुन आला.

बोईसर व चित्रालयमधील मोठ्या बाजारपेठा, भाजी व मच्छी मार्केट, हॉटेल्स तसेच सहा व तीन आसनी रिक्षा चालक बंदमध्ये सहभागी झाल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. तसेच काही शाळा व खाजगी क्लासेस देखील बंद ठेवण्यात आले होते. भीमनगर येथे तरुणांकडून रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. तर ओसवाल येथे अतिरेक्यांचे प्रतिसात्मक पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. यामुळे काही काळाकरीता वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, बोईसरमधील बँका, एमआयडीसीमधील कारखाने तसेच पोस्ट कार्यालय मात्र नियमित सुरू होते. तारापूर एमआयडीसीमधील उद्योजकांनी एकत्र येत शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहली.

पालघरमध्ये मात्र बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. येथे सकाळी रिक्षा युनियनने बंद पुकारला होता. व्यापारी वर्गाने देखील बंदला पाठिंबा देत दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली होती.

कुंभवली येथे शहिदांना श्रद्धांजली

बोईसर, दि. 17 : युवासेनेच्या कुंभवली-एकलारे, मुरबे, नांदगांव, आलेवाडी, नवापुर, टेंभी व पाम विभागातर्फे कुंभवली येथे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत व पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. युवासेनेचे उपजिल्हा अध्यक्ष व भारतीय माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे स.चिटणीस सुमित पिंपळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हाप्रमुख राजेश शहा, आमदार अमित घोडा, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश गंधे, जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील, सभापती मनीषा पिंपळे, तालुका प्रमुख विकास मोरे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र मेर व सुशिल चुरी, माजी जिल्हा महिला संघटक नमिता राऊत व इतर कार्यकर्त्या, शिवसैनिक, युवासैनिक, रिक्षा युनियन पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शूरवीरांचे रक्त व्यर्थ जाऊ देऊ नका, श्रमजीवीचे पंतप्रधानांना पत्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी काल शनिवारी श्रमजीवी संघटनेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या संदर्भात पंतप्रधानांना लिहिलेले पत्र प्रभारी निवासी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नवनाथ झरे यांना दिले. यावेळी हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रमजीवी संघटनेचा तरुण वेळ पडल्यास भारत मातेच्या रक्षणासाठी आपले प्राण देण्यास तयार आहे. आता फक्त आश्वासन नको, कृती हवी आहे. शूरवीर जवानांचे रक्त व्यर्थ जाऊ देऊ नका, अशी मागणी सदर पत्रात करण्यात आली आहे. यावेळी पालघर तालुक्यातील श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top