दिनांक 20 May 2019 वेळ 11:55 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न!

डहाणू नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न!

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 17 : डहाणू नगर परिषदेतर्फे दिव्यांगांना आर्थिक सहाय्य व बचत गटांना फिरता निधी अनुदान धनादेशांचे वाटप तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज, 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दशाश्री माळी हॉल येथे खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते व नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार पास्कल धनारे व जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे उपस्थित होते. तर पंचायत समिती सभापती राम ठाकरे, उप नगराध्यक्ष रोहींटन झाईवाला, बांधकाम सभापती जगदीश राजपूत, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे, भाजपाचे जेष्ठ नेते बाबाजी काठोळे, विरोधी पक्ष गटनेत्या किर्ती मेहता, विवेक कोरे, रमेश कर्णावट, रुक्साना मझदा, विनीता कोरे, शशी बारी, शमी पिरा आदींसह आजी-माजी नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शुरविरांना आदरांजली वाहण्यात आली.

नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी प्रास्ताविक करताना मागील एक वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेल्या व पुढील काळात प्रस्तावित असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. दिव्यांगांना आर्थिक सहाय्य करणारी डहाणू नगर परिषद ही जिल्ह्यात पहिली आणि एकमेव नगर परिषद असून प्रत्यक्षात 3 टक्के निधी उपलब्ध असताना विशेष बाब म्हणून 5 टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणार असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. तसेच नगर परिषदेच्या हद्दीतील तीन तलावांचे सुशोभीकरण, ओपन जीम तयार करणे, कोस्टल रोडचे सुशोभीकरण, स्मशानभुमींची दुरुस्ती, जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय इत्यादी विकास कामे प्रस्तावित असून ती लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सांगुन बरेच वर्ष प्रलंबित असलेली पाणी पुरवठा योजना पुढील दोन महिन्यात पूर्णत्वास येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे महिलांसाठी विविध 13 विषयांचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. तसेच नगर परिषद हद्दीतील कचरा संकलनासाठी 15 गाड्या घेतल्या असून डहाणूतील विविध ठिकाणच्या डंपिंगचा प्रश्‍न मार्गी लावला असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना राजपूत म्हणाले की, नगर परिषदेमार्फत होत असलेली विविध विकास कामे जास्तीत जास्त काटकसरीने करून वाचलेला निधी इतर विकास कामांसाठी तसेच त्यासाठी लागणारी स्वतःची साधन सामुग्री घेण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच पुढील काळात नगर परिषदेची स्वतःची कार्यालयीन इमारत होणार असून नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय देयकांसाठी आणि सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून बरेच वर्ष प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या विकास कामांना विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून मोलाचे सहकार्य लाभले व नगरपरिषदेचे अनुभवी मुख्याधिकारी तांत्रिक आणि कायदेशीर बाबी चांगल्या प्रकारे हाताळत असल्याचे सांगत राजपूत यांनी त्यांचे आभार मानले.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार पास्कल धनारे यांनी सांगितले की, आमदार बच्चू कडू हे एकमेव विकलांगांचे प्रश्‍न मोठ्या हिरीरीने सभागृहात मांडतात तसेच भरत राजपूत यांनी विकलांगांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत 90 टक्के कामे पूर्ण झाली असून अजूनही याकामी लक्ष घालण्याची सूचना त्यांनी केली. नगर परिषदेत या आधी घरकुलाची योजना कधीच नव्हती परंतू डहाणू नगर परिषदेतर्फे घरकूल योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच मंजूरी मिळेल आणि मुख्यमंत्र्यांनीही निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे, अशी माहिती धनारे यांनी दिली.

तर खासदार गावीत म्हणाले की, विकासाची व्याख्या ही डहाणू नगर परिषदेचे काम पाहिल्यावर स्पष्ट होते. नगर परिषदेला फार पराकाष्ठेने निधी मिळालेला आहे. त्यामुळे त्याचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे असे सांगतानाच प्रस्तावित विकास कामे चांगल्या प्रकारे होण्यासाठी या कामांवर स्वतः लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. आपण राज्यमंत्री असताना आदिवासी भागातील नगर परिषद म्हणून डहाणू नगर परिषदेला बराच निधी उपलब्ध करून दिला होता, असेही गावीत म्हणाले. विरार वसई महानगरपालिकेपेक्षाही आपल्या छोट्या डहाणू नगर परिषदेचे काम उत्तम प्रकारे होत असल्याचे गौरोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.

यावेळी रमेश खरपडे, बाबाजी काठोळे, शशी बारी, रमेश कर्णावट व किर्ती मेहता यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना डहाणू नगर परिषदेतर्फे होणार्‍या विविध विकास कामांचे कौतुक करुन नगराध्यक्ष भरत राजपूत व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन केले. शेवटी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांना व बचत गटांना धनादेशांचे वाटप, विविध लाभार्थ्यांना एलईडी दिव्यांचे वाटप व कचरा संकलनाच्या 15 गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधव, बचत गटाच्या महिला, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE कराcomments

About Rajtantra

Scroll To Top