दिनांक 21 April 2019 वेळ 4:30 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा रस्ता रुंदीकरण वाद : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

वाडा रस्ता रुंदीकरण वाद : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

  • चर्चेअंती नियमाप्रमाणेच रस्ता रूंदीकरण करण्याचे शिंदे यांनी दिले आदेश
रस्ता रूंदीकरणाबाबत पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिलेल्या नविन आदेशासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेत सर्वपक्षीय नेत्यांनी काल, मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे 15 मीटरच रस्ता रूंदीकरण करण्याची मागणी केली.

प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा शहरातील रस्ता रुंदीकरणावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्‍वभुमीवर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.12) मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वाडा शहरातील नागरिकांच्या भावना व शहराच्या विकासाच्या दृष्टीने रस्ता रूंदीकरणाच्या आवश्यकतेवर चर्चा केली. या चर्चेत सकारात्मक भूमिका घेत शिंदे यांनी बांधकाम विभागाला नियमाप्रमाणे रूंदीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.

पालघर – वाडा- देवगाव हा राज्य महामार्ग उन्नत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले असुन याअंतर्गत वाडा शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व 15 मीटर रुंदीकरणास अंदाजपत्रकात मंजूरी देण्यात आली. त्यानुसार प्रस्तावित कामाची मार्जिन लाईन निश्चित केल्यानंतर अनेक व्यापार्‍यांच्या दुकानांची अतिक्रमित बांधकामे तोडावी लागणार असल्याने व्यापार्‍यांनी या रुंदीकरणाला विरोध दर्शविल्याने आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली व्यापार्‍यांसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत 15 मीटर ऐवजी 12 मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी आहे.

पालघर – वाडा – देवगाव या राज्य महामार्गावरील वाडा शहरातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका दरम्यान किमी 53/800 ते किमी 54/500 एवढ्या लांबीच्या राज्य महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत हा रस्ता 7 मीटर रुंदीचा असून तो 15 मीटर रुंदीचा झाल्यास दोन्ही बाजूस अंतर्गत गटार, पाणीपुरवठा पाईप लाईन, दुभाजक, पदपथ, विद्युत खांब व इतर आवश्यक सुविधा निर्माण करण्याबाबत अंदाजपत्रकात तरतूद नमूद आहे. भूमिअभिलेख कार्यालयाकडील उपलब्ध अभिलेखानुसार 16 मीटर रस्ता दर्शविला आहे. मात्र व्यापार्‍यांनी विरोध केल्याने या विरोधाची दखल घेत पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी नुकतीच बांधकाम विभागाचे अधिकारी व व्यापार्‍यांची मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत रस्ता 15 मीटर ऐवजी 12 मीटरचा करावा, असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे वाड्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक आक्रमक होऊन या निर्णयाविरोधात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तातडीने काल एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेऊन या रस्त्याबाबत वाडावासियांची व्यथा मांडली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात रूंद रस्ते झाल्याने शहराच्या विकासात कशी भर पडली याचे उदाहरण देऊन बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून 15 मीटर रस्ता रूंदीकरणाचे आदेश दिले, अशी माहिती शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी दिली.

या शिष्टमंडळात माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते संदीप गणोरे, उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, बहुजन विकास आघाडीचे अनंता भोईर, सामाजिक कार्यकर्ते अनंत सुर्वे, अनंता वनगा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अमिन सेंदु, शेकापचे सचिन मुकणे, नगरसेविका नयना चौधरी, नगरसेविका जागृती काळण आदी सहभागी झाले होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top