दिनांक 21 October 2019 वेळ 3:32 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » व्यापार्‍यांच्या दबावामुळे रस्ता रूंदीकरणास मर्यादा!

व्यापार्‍यांच्या दबावामुळे रस्ता रूंदीकरणास मर्यादा!

  • वाडा शहरातील रस्ता रुंदीकरण आता 16 ऐवजी 12 मीटर
  • पालकमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाविरोधात सर्वपक्षीय आक्रमक

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : वाडा शहरातून जाणारा पालघर – वाडा – देवगाव हा राज्य महामार्ग उन्नत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. त्याअंतर्गत वाडा शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी 15 मीटर रुंदीकरणास अंदाजपत्रकात मंजूरी देण्यात आली. त्यानुसार प्रस्तावित कामाची मार्जिन लाईन निश्चित केल्यानंतर अनेक व्यापार्‍यांच्या दुकानांची अतिक्रमित बांधकामे तोडावी लागणार असल्याने व्यापार्‍यांनी या रुंदीकरणाला विरोध दर्शविला होता. यापार्श्‍वभुमीवर नुकतीच आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली व्यापार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत 15 मीटर ऐवजी 12 मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी आहे. तर मंत्री सवरांनी सार्वजनिक हित लक्षात न घेता मूठभर व्यापार्‍यांच्या दबावापुढे रस्ता रुंदीकरणाचा निर्णय बदलल्याने याविरोधात सर्वपक्षीय एकवटले असून लवकरच मुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांची भेट घेणार आहेत.

पालघर – वाडा – देवगाव या राज्य महामार्गावरील वाडा शहरातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका या दरम्यान किमी 53/800 ते किमी 54/500 एवढ्या लांबीच्या राज्य महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत हा रस्ता सात मीटर रुंदीचा असून तो 15 मीटर रुंदीचा झाल्यास दोन्ही बाजूस अंतर्गत गटार, पाणीपुरवठा पाईप लाईन, दुभाजक, पदपथ, विद्युत खांब व इतर आवश्यक सुविधा निर्माण करण्याबाबत अंदाजापत्रकात तरतूद नमूद आहे. भूमिअभिलेख कार्यालयाकडील उपलब्ध अभिलेखानुसार 16 मीटर रस्ता दर्शविला आहे. त्यामुळे नियमानुसार व्यापार्‍यांची वाढीव बांधकामे ही अतिक्रमण ठरत आहे. वाढती रहदारी, वाडा शहरात नियमित होणारी वाहतूककोंडी, शहराला आलेले बकालपण पाहता हे रुंदीकरण करून चांगल्या दर्जाचा रस्ता बनणे नितांत आवश्यक असताना मूठभर व्यापार्‍यांच्या दबावाला बळी पडत मंत्री सवरांनी रस्ता रुंदीकरणाचा निर्णय बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या निर्णयामुळे वाडा शहरासह तालुक्याच्या उत्तरेकडील दुर्गम परिसर विकासावर याचा परिणाम होईल. या बैठकीला शहरातील मूठभर व्यापार्‍यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच उपस्थित असल्याने शहरातील 98 टक्के नागरिकांना विश्वासात न घेता तसेच भविष्यात भेडसावणार्‍या समस्यांचा विचार न करता घेण्यात आलेल्या या निर्णयास शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय, कुणबी सेना आदी पक्ष संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे रस्तारुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. दरम्यान अभिलेखानुसार अस्तित्वात असलेला रस्ता 16 मीटरच रुंद व्हायला हवा अशी मागणी जोर धरत असून रस्ता रुंदीकरणासाठी शहरात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतरही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रकानुसार रस्ता रुंदीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

रस्ता रूंदीकरण अवघे 12 मीटर झाल्यास मंजूर अंदाजपत्रकानुसार प्रस्तावित बहुतेक सुविधा होऊ शकणार नाहीत. वाढत्या लोकसंख्येनुसार व वाढत्या वाहन समस्यांनुसार पुन्हा काही वर्षातच आजचीच गंभीर समस्या पुन्हा निर्माण होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील धोके लक्षात घेऊन अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे काम होणे आवश्यक आहे. 12 मीटर रुंदीकरणाच्या निर्णयास शिवसेना तीव्र विरोध करेल.
संदीप गणोरे, गटनेते, शिवसेना, नगरपंचायत, वाडा

वाडा शहरातील हा रस्ता शासनाच्या नियमानुसारच 16 मीटर व्हावा ही आमच्या पक्षाची मागणी असून बाजारपेठेतील व्यापारी वर्ग बहुतांश भाजपला अनुकूल असल्याने पालकमंत्र्यांनी हा एकतर्फी निर्णय घेतला आहे.
-अमिन सेंदू, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, वाडा शहर

वाडा तालुक्याची लोकसंख्या सुमारे अडीच ते तीन लाख असून तालुक्यासाठी वाडा हीच मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे दिवसागणिक येथील वाहतुकीची समस्या बिकट बनणार आहे. म्हणून रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे. त्याकरिता नागरिकांच्या सह्यांची मोहीम हाती घेणार आहोत.
-सचिन मुकणे, नेते, शेतकरी कामगार पक्ष

रस्ता रुंदीकरणाबाबतीत व्यापार्‍यांनी पालकमंत्र्यांची दिशाभूल केली आहे. सद्यस्थितीतील अभिलेखांवरून व्यापार्‍यांची बांधकामे ही अतिक्रमणे ठरत असून कोणताही लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी या अतिक्रमणाला संरक्षण देऊ शकत नाही.
-अनंत सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?

  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top