दिनांक 22 August 2019 वेळ 3:14 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » कुपोषण निर्मुलनासाठी सकस आहार बगीच्यांची निर्मिती करणार!

कुपोषण निर्मुलनासाठी सकस आहार बगीच्यांची निर्मिती करणार!

  • कोसबाड कृषि विज्ञान केंद्र व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांचा उपक्रम

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 12 : पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासकीय तसेच अशासकीय संस्था आपापल्या पध्दतीने चांगले कार्य करत आहेत. त्यालाच एक सहाय्य म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीचे कोसबाड हिल येथील कृषि विज्ञान केंद्र संतुलित आहारासाठी लागणार्‍या जीवनसत्त्व, खनिजयुक्त भाजीपाला तसेच फळ पिकांची लागवड करून आदर्श सकस आहार बगीच्यांची निर्मिती करण्याचा उपक्रम राबवणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला चेन्नई येथील एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन तसेच दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मोलाचे सहाय्य मिळणार असून कुपोषण निर्मुलन कार्यास निश्‍चित वेग मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनचे जैवतंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. हरीहरन यांनी नुकतीच कोसबाड येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध स्तरांवरील झालेल्या चर्चेत या उपक्रमाचे महत्त्व व व्याप्ती सविस्तर विषद केली. सकस आहाराच्या माध्यमातून कुपोषण निर्मुलन ही शाश्‍वत पध्दत असून आदिवासी भागात याबाबत व्यापक जनजागृतीसाठी कम्युनिटी हंगर फायटर तयार करावे लागतील, असे मत डॉ. हरीहरन यांनी व्यक्त केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता विशेषत: सर्वेक्षणासाठी कृषी पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सहाय्य घेण्याचे सुचविले असून विद्यापीठस्तरावर डॉ. मंदार खानविलकर तसेच डॉ. राणे हे मार्गदर्शक म्हणून काम पाहतील, असे सांगितले.

कुपोषण निर्मुलनासाठी हा पथदर्शी प्रकल्प असून स्वामिनाथन फाऊंडेशनतर्फे देशातील कानपूर, चेन्नई, जयपूर आणि पालघर या चार ठिकाणी हा प्रकल्प राबविला जात असून यामुळे आदिवासी भागातील कुपोषण निर्मुलन होण्यास निश्‍चितच मदत होईल, असे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विलास जाधव यांनी आवर्जुन सांगितले. या उपक्रमासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रिं. एस. बी. पंडित, ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ तथा संस्थेचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी तसेच विभागीय सचिव प्रिं. प्रभाकर राऊत यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top