दिनांक 21 July 2019 वेळ 6:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभाग रामभरोसे

मोखाडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभाग रामभरोसे

>> शिक्षकांचे 111 पदे रिक्त  >> गटशिक्षणाधिकारीही प्रभारी, >> पदोन्नतीचे घोडे अडलेले  >>रिक्त पदांचा आकडा वाढणार?

दीपक गायकवाड /मोखाडा, दि. 11 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 111 शिक्षकांची पदे रिक्त असतानाच बहूतांश शिक्षक विकल्पातून जिल्हा बदली करून गेल्याने आधीच अनुशेष असलेल्या मोखाडा तालुक्याची शिक्षण व्यवस्था आणखीनच खिळखिळी झाली आहे. अशा परिस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड होत असल्याने तातडीने अतिरिक्त शिक्षकांची तजविज करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

मोखाडा तालुक्यात 13 केंद्र शाळा असून 50 हुन अधिक 8 वी पर्यंत, तर 100 हुन अधिक 5 वी पर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा आहेत. तालुक्यात सद्यस्थितीत 24 मंजूर मुख्याध्यापकांपैकी 20 मुख्याध्यापक कार्यरत असून 4 ठिकाणची पदे रिक्त आहेत. तसेच 104 पदवीधर शिक्षकांपैकी केवळ 31 शिक्षक कार्यरत असून 73 पदे रिक्त आहेत. तर सहाय्यक शिक्षकांची 37 पदे रिक्त असुन असा एकूण 111 शिक्षकांचा अनुषेश आहे. विशेष म्हणजे पटनिश्चितीनंतर हा आकडा 200 च्या घरात पोहोचणार आहे. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षणव्यवस्था सांभाळायची कशी? हा यक्ष प्रश्‍न स्थानिक प्रशासनाला भेडसावत आहे. तर दुसरीकडे अपूर्‍या शिक्षकांमुळे स्थानिक प्रशासनाला अनेकदा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच गट शिक्षणाधिकार्‍यांचे पदही प्रभारी आहे तर विस्तार अधिकार्‍यांची 5 पदे मंजूर असताना केवळ दोनच विस्तार अधिकारी कार्यरत असून तालुका प्रशासन आणि प्राथमिक शाळांमधील महत्वाचा व्यवस्थापकीय दुवा समजला जाणार्‍या केंद्रप्रमुखांचीही 3 पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाला सध्या तरी तारेवरची कसरत करावी लागत असुन अनेक ठिकाणी शाळांना टाळे ठोकणे व उपोषणासारखे प्रकार निस्तरावे लागत आहेत.

एकूणच लक्षणिय अनुषेशाबाबत चौकशी केली असता, रिक्त पदे भरण्याची जबाबदारी वरिष्ठ प्रशासनाची असल्याने जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी नोंदविली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याचा कयास प्रभारी गटशिक्षणाधिकारी रामश्चंद्र विशे यांनी व्यक्त केला आहे. गटविकास अधिकारी संगीता भांगरे-डहाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या आजारपणामुळे संपर्क होऊ शकला नाही.

विकल्पाचे घोडे धावणार कधी?
ठाणे आणि नवनिर्मित पालघर जिल्ह्यातील विकल्पांतर्गत बदल्यांचे घोडे तब्बल दोन-तीन वर्षांपासून अडलेले आहेत. पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन प्रदीर्घ कालावधी उलटूनही वरिष्ठ प्रशासनाकडून अद्यापही कोणतीच हालचाल होत नसल्याचे चित्र आहे. वास्तविकतः विकल्पाच्या मुद्द्याचा निपटारा हा एकूणच भरती प्रक्रियेपूर्वी होणे आवश्यक असतानाही त्याबाबत कमालीची चालढकल केली जात आहे.

पालघर जिल्ह्यात इतरही तालुक्यांमधुन जिल्हा बदलीवर कर्मचारी सोडलेले आहेत. आगामी भरती प्रक्रियेपूर्वी पदवीधरांची पदोन्नती, विकल्पातील बदल्या आदी अनुशेष वाढवणार्‍या बाजू पूर्णपणे तपासूनच भरतीची प्रक्रिया राबवणे उचित राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. अन्यथा नव्याने भरती करूनही अनुशेषाची तफावत कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच भरती प्रक्रियेत संपूर्ण पालघर जिल्ह्यातून पेसा कायद्यांतर्गत पात्र स्थानिक भुमीपुत्रांना प्राधान्यक्रम देण्यात यावा अशी मागणीही या धर्तीवर स्थानिक भुमीपुत्रांमधून पुढे येत आहे.
मोखाडा तालुक्यात प्राथमिक शिक्षकांची टंचाई पुढील काळात दुर होण्याची शक्यता असली तरी तुर्तास टंचाई आणि जनतेच्या रोषालाच स्थानिक प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top