डहाणू न्यायालयात भुकंप विषयावर व्याख्यान संपन्न!

0
79

राजतंत्र न्युज नेटवर्क

डहाणू, दि. 5 : डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून जाणवणार्‍या भुकंपाच्या धक्क्यांमुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच 1 फेब्रुवारी रोजी डहाणूत झालेले भूकंपाचे धक्के न्यायालय इमारत व न्यायाधीश निवासामध्येही जाणवले. त्यामुळे अशा परिस्थितीत न्यायालयीन इमारत, त्यातील महत्वाची कागदपत्रे, कर्मचारी, वकील पक्षकार यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेत दिवाणी न्यायाधीश श्री. जे. आर. मुलाणी यांनी पुढाकार घेऊन सोमवारी, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता भूकंप या विषयातील जागतिक पातळीवर कार्यरत असलेले शास्त्रज्ञ महेश यशराज यांचे व्याख्यान आयोजित केले होते.  श्री. मुलाणी यांनी प्रास्ताविक करताना या भागात भुकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य विशद करून ज्ञान माणसाला वाचवते आणि अज्ञान माणसाला मारते म्हणून आज आपण महत्वाच्या विषयाचे ज्ञान घेऊ, असे सांगून यशराज यांना व्याख्यान सुरु करण्याची विनंती केली.  यशराज यांनी आपल्या व्याख्यानात भूगर्भामध्ये वेळोवेळी होणारी स्थित्यंतरे, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचे सविस्तर विवेचन करून त्यांनी पुढे असे सांगितले की, भूकंप येण्याआधी त्याची पूर्व सूचना मिळत असते परंतू आपल्या अज्ञानामुळे आपल्याला त्याची जाणीव होत नाही. भूकंपामुळे भूगर्भामध्ये होणार्‍या बदलांची जाणीव पक्षी व प्राण्यांना त्यांच्या अतिसंवेदनशील घाणेंद्रियांमुळे लवकर होते व ते विचित्रपणे वागू लागतात, ओरडायला लागलात. ही एक फार मोठी पूर्व सुचना भूकंपाबाबत मिळत असते. ही सूचना आपल्याला लक्षात येत नसल्यामुळे भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होते असे सांगून त्यांनी किल्लारी व भूज येथील भूकंपाचे उदाहरण दिले.  भूकंप आल्यावर घरातील विद्युत पुरवठा खंडीत करावा, गॅस सिलेंडर त्वरीत बंद करावा व मोकळ्या मैदानात आसरा घ्यावा तसेच झाडाखाली, विजेच्या तारांखाली व उंच इमारतींजवळ उभे रहाणे अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. तर भूकंपादरम्यान घराबाहेर पडणे अशक्य झाल्यास अवजड पलंगाखाली किंवा टेबलाखाली आसरा घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. भूकंपामुळे जरी इतर काही नुकसान झाले नाही तरी त्याामुळे तयार होणारा मिथेन वायू भूगर्भातील पाण्यात मिसळतो आणि ते पाणी प्यायल्यामुळे विविध आजार होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत पाण्याचेे शास्तत्रोक्त परिक्षण करूनच पाण्याचा वापर करावा, अशी सूूचना त्यांनी केली. आज जगात 365 दिवसांत विविध ठिकाणी 89 हजाराच्या आसपास लहान-मोठ्या तिव्रतेचे भुकंप होत  असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. भूकंप केव्हा होईल, किती तिव्रतेचा होईल, कोणत्या ठिकाणी होईल याचे भाकीत करणेे फार अवघड असून जगातील शास्त्रज्ञ याविषयी अभ्यास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यशराज यांनी यावेळी सर्व मााहिती चित्रफितीद्वारे समजावून सांगितली.  या कार्यक्रमाला सह दिवाणी न्यायाधीश श्री. ओ. जे. कुलकर्णी व श्री. एस. एन. मुळीक, वकील, कर्मचारी, पक्षकार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी श्री. मुळीक यांनी पुष्पगुच्छ देऊन महेश यशराज यांचे आभार मानले. 

Print Friendly, PDF & Email

comments