दिनांक 21 January 2020 वेळ 4:38 AM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » पोर्‍याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी

पोर्‍याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी

मोखाडा : पोर्‍याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी इतर दिवशी 1 वाजता उघडते शाळा वरिष्ठांचा धाक नसल्याने बेबंदशाही प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : मोखाडा तालुक्यातील पोर्‍याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळा कायम दर शनिवारी बंद ठेवण्यात येत असुन इतर दिवशी 12 ते 1 च्या दरम्यान उघडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आदिवासी होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर दोन आठवडे शाळा सुरळीत सुरू होती. मात्र त्यानंतर पुन्हा त्यामध्ये दिरंगाई व खंडीतपणा कायम आहे. या शाळेतील विद्यार्थी तसेच महिला ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडपाडा जिल्हा परिषद केंद्रात येणार्‍या पोर्‍याचापाडा जिल्हा परिषद शाळेत सरीता ढेरे या शिक्षिका कार्यरत आहेत. मात्र त्या प्रत्येक शनिवारी शाळेत गैरहजर असतात. येथे पहिली ते पाचवीपर्यंत एकुण 19 विद्यार्थी शिक्षण घेत असून ही शाळा एक शिक्षकी आहे. त्यामुळे एकमेव असलेला शिक्षकच उपस्थित नसल्यास शाळेला कृत्रीम टाळेबंदीशी सामना करावा लागतो. पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वरिष्ठांचे या गंभीर बाबीकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने ही बेबंदशाही व आओ-जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती बोकाळली असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ सुनंदा पोकळे व सावित्री झुगरे यांनी दिली आहे. तर शिक्षक हजर नसल्याकारणाने प्रत्येक शनिवारी आमची शाळा बंद राहाते व इतर दिवशी 12 ते 1 च्या दरम्यान उघडून 4 वाजता सुट्टी होत असल्याचे येथील विद्यार्थी तेजस झुगरे व राजेश झुगरे यांनी सांगितले. याबाबत वाकडपाडा केंद्रशाळेचे केंद्रप्रमूख राजेंद्र जागले यांच्याशी संपर्क साधला असता, वस्तूस्थितीला दुजोरा मिळाला असून शनिवारी शाळा उघडत नसल्याचे स्पष्टीकरण मिळाले आहे. परंतु प्रस्तूत शिक्षिकेचे काम समाधानकारक असल्याने आम्ही या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याचे जागले यांनी सांगितले. तर प्रभारी गटशिक्षणाधिकारी रामश्चंद्र विशे यांचेशी संपर्क साधला असता याबाबत चौकशी करून कारवाई करतो, असे मासलेवाईक उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, खोडाळा पंचक्रोशीतील बहूतांश शाळेवरील शिक्षक प्रत्येक शनिवारी सकाळची शाळा 7.20 ला भरवण्याचा नियम असतानाही 8.15 वाजेपर्यंत मोखाडा व खोडाळा चौफूलीवरच वेळ दवडीत असल्याचे आढळतात. मात्र याकडे दुर्लक्ष करुन मोखाडा पंचायत समिती व शिक्षण विभाग कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने अशा शिक्षकांचे फावले आहे. काही दिवसांपुर्वी ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर दोन आठवडे शाळा सुरळीत सुरू होती. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे. मात्र विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व यावर धडे देणारे शिक्षकच खुद्द वेळेचे महत्व पाळणार नसतील तर विद्यार्थ्यांवर त्याचे काय परिणाम होतील? असा सवाल उपस्थित होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top