दिनांक 06 April 2020 वेळ 4:38 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र

MUMBAI-BADODA DRUTGATI MAHAMARG VIRODHशेतकर्‍यांच्या बैठकीत मोजणीस तीव्र विरोध करण्याचे सूतोवाच
राजतंत्र न्युज नेटवर्क
मनोर, दि. 1 : प्रस्तावित मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेतील संयुक्त जमीन मोजणीच्या विरोधाची दिशा ठरविण्यासाठी रावते ग्रामपंचायत सभागृहात बोराशेती, रावते आणि चिंचारे गावातील शेतकर्‍यांची बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकर्‍यांनी महामार्गाला प्रखर विरोधाची भूमिका मांडत येत्या चार तारखेपासून सुरू होणार्‍या मोजणीस तीव्र विरोध करण्याचा निश्‍चय केला.
प्रस्तावित मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला महसूल प्रशासनाने गती दिली असून जमिनीच्या संयुक्त मोजणीस सुरुवात केली आहे. दहिसर, साखरे, नावझे, खामलोली, निहे आणि नागझरी गावात शेतकर्‍यांच्या प्रखर विरोधात मोजणी करण्यात आली. किराटमध्ये शेतकर्‍यांनी विरोध करीत मोजणीचे काम सहा तास रोखले होते. मोजणीदरम्यान महसूल विभागाचे अधिकारी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याऐवजी धाक दपटशाहीने वागत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघर्ष समिती आणि इतर संघटनांनी येत्या चार तारखेपासून बोराशेती, रावते आणि चिंचारे गावात सुरू होणार्‍या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र करण्याचा निर्धार केला.
बाधित शेतकर्‍यांचे प्रश्‍न एकून त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याऐवजी महसूल विभागाचे अधिकारी शेतकर्‍यांना दमदाटी करतात. त्यांचा वैयक्तिक व्यवसाय विचारून कारवाईची भाषा केली जाते, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी आपल्या भाषणात केला.
पालघर जिल्ह्यात मोठमोठे प्रकल्प येऊ घातले आहेत. या प्रकल्पामुळे येथील मच्छीमार, आदिवासी आणि भूमिपुत्रांना विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. बुलेट ट्रेन आणि मुंबई बडोदा महामार्गाचा स्थानिकांना उपयोग होणार नाही. आता जीवनमरणाची लढाई आहे. शेतकर्‍यांनी कुटुंबासह आंदोलनात भाग घेऊन महामार्गासाठीच्या जमीन मोजणीस विरोध करावा असे सांगतानाच येत्या काळात मुंबई बडोदा महामार्गाच्या जमीन मोजणीस तीव्र विरोध करण्याचा मनसुबा आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदाडे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
बैठकीस सूर्या पाणी बचाव समितीचे अध्यक्ष रमाकांत पाटील, आदिवासी पुनर्वसन आंदोलनाचे अविनाश पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी भूमिसेनेचे डॉ. सुनील पर्‍हाड, शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष कमलाकर अधिकारी, सुरेश पर्‍हाड, बाबुराव भूतकडे, स्थानिक माथाडी कामगार संघटनेचे लोखंडे, ग्रामस्थ, महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top