साहेब येणार असल्याने गेटला टाळे लावले; रुग्णाचा मृत्यू

0
15

WADA RUGN MRUTYUप्रतिनिधी/वाडा, दि. 28 : स्वच्छतेचा दिखाऊपणा करण्यासाठी कर्मचार्‍याने लढवलेली शक्कल एका रुग्णाच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना वाडा ग्रामीण रुग्णालयात घडली असुन वेळेवर उपचार न मिळाल्याने रोहिदास मानमुळ या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.

वाडा ग्रामीण रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा उपचाराची अत्याधुनिक मशीन लावण्यात आली असुन या मशीनच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यातून व मुंबईहुन तज्ञ येणार असल्याने त्यांच्यासमोर स्वच्छतेचा दिखाऊपणा करण्यासाठी अंतर रुग्ण विभागाला सोमवारी दुपारच्या वेळेस टाळे लावण्यात आले होते. याच वेळी खानिवली येथून अपघात झालेला अतिगंभीर रुग्ण रोहिदास मनीमुळे (वय 55) यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असता गेटला टाळे लावलेले होते. याबाबत संबंधित कर्मचार्‍याला विचारले असता साहेब येणार असल्याने टाळे लावले असल्याचे त्याने सांगितले. तसेच विनंत्या केल्यानंतर त्याने 10 मिनिटांनतर गेट उघडला. यानंतर सदर रुग्णाला आत घेण्यात व वैद्यकीय अधिकारी उपचार करण्यासाठी गेले. मात्र पुढे काही वेळातच रुग्ण मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांकडून नातेवाईकांना सांगण्यात आले.

त्यामुळे गेटला टाळे लावले असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी व तेथे उपस्थित असलेल्या नागरीकांनी केला असुन याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदिप जाधव यांना विचारणा केली असता सफाईचे काम चालू होते म्हणून गेटला टाळे लावण्यात आले होते. मात्र रुग्णांसाठी नेहमी गेट उघडाच असतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Print Friendly, PDF & Email

comments