राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर दि. 24 : पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील गावकर्यांनी अनिल चौधरी या मच्छीमार व्यावसायिकाला एका वर्षापासून वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला असून चौधरी कुटूंबियांनी पोलीसांकडे कैफियत मांडली आहे. गावकर्यांनी 2017 मध्ये वादग्रस्त जागेचा मैदानासाठी कब्जा घेण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनात सहभाग न घेतल्याची शिक्षा मिळाली असून कुटूंबियातील 7 वर्षीय मुलीशी देखील कोणी बोलत नाही इतका हा बहिष्कार कडक असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. अखेर ही कोंडी सहन न झाल्यामुळे पोलीसांकडे गेल्याचा दावा चौधरी कुटूंबाने केला आहे.
नोव्हेंबर 2017 मध्ये सातपाटी गावातील नागरिकांनी श्रॉफ मैदान नावाने ओळखल्या जाणार्या खासगी जागेवर हक्क सांगून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून झालेल्या आंदोलनात गावकर्यांवर पोलिसांनी गुन्हे देखील नोंदवले होते. मात्र चौधरी कुटूंबियांचा कायदा हातात घेण्यास विरोध असल्याने ते अलिप्त राहीले. या प्रकरणांमध्ये सहभाग न घेतल्याने गावकर्यांनी एकत्र येत चौधरी यांच्या घरावर दोन वेळा मोर्चा देखील काढला होता. तसेच अनेकवेळा शिवीगाळ व दमदाटी करून कुटूंबाला वाळीत टाकल्याचा आरोप आहे.
अनिल चौधरी हे मच्छीमार व्यवसाय करणारे त्यांची स्वतःची बोट आहे. मात्र कोणत्याही व्यापार्यांनी त्यांच्या बोटीतील मासे खरेदी करु नयेत, तसेच या कुटूंबाला जे मदत करतील किंवा त्यांच्याशी बोलतील अशांची कुटूंबे देखील वाळीत टाकली जातील असा अलिखीत फतवा काढण्यात आला. चौधरी कुटूंबाबरोबर गावातील सर्वच व्यवहार बंद करावेत, त्यांचे गावातील राम मंदिराचे सदस्यत्व रद्द करावे, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये अशा प्रकारचे मॅसेजेस गावातील मांगेला समाज सातपाटी या व्हॉट्स अॅप ग्रुपवर फिरत राहिले व ते प्रत्यक्षात कृतीत देखील आले.
वर्षभरापासून चौधरी यांना मासे अन्यत्र जाऊन विकावे लागत आहेत. त्यांच्या चिमुकल्या नातीची खाजगी शिकवणी बंद करण्यात आली आहे. नातेवाईकांवर बहिष्कार ओढवू नये याकरीता त्यांच्याकडे लग्नप्रसंगात जाता येत नाही. ज्या मित्रांनी साथ देण्याचा प्रयत्न केला त्यांनादेखील बहिष्काराचा तडाखा बसला. बहिष्कृत कुटूंबात कोणाचे निधन झाले तरी गावकर्यांनी त्यांच्या अंत्यविधीला जाऊ नये असाही फतवा सोशल मिडीयावर फिरला.
वर्षभर हे सहन केल्यानंतर जेव्हा लहान मुलांची कोंडी होऊ लागली तेव्हा त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ नये याकरीता अखेर अनिल चौधरींनी पोलीसांकडे धाव घेतली.
चौधरींनी सातपाटी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीमध्ये संबंधीतांवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 149 आणि महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण आधीनियम, 2016 चे कलम 5 व 7 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
हे 2017 चे प्रकरण आहे. मात्र तक्रारदारांनी आता तक्रार दिली असून याबाबत चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये तथ्य आढळल्यास आरोपीतांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
– जितेंद्र ठाकूर
प्रभारी अधिकारी, सातपाटी सागरी पोलीस स्टेशन
गावाने चौधरी कुटूंबियांवर बहिष्कार टाकलेला नाही. त्यांच्या तक्रारीरीतील आरोप बिनबुडाचे असून त्यांच्याशी व्यवहार चालू आहेत.
अरविंद पाटील
सरपंच, सातपाटी
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा