
येथील पळसूंडे गावच्या हद्दीतील सैन्य पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्रात भेडसावणाऱ्या विविध समस्या व अपुऱ्या सोयी सुविधांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रकल्प कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करीत महादेव कोळी समाज उन्नती मंडळाच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थींनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी उपस्थित नसल्याने सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व लवकरात लवकर शासन निर्णयानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
या आंदोलनात महादेव कोळी समजोन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय गोपाळ शिंदे, युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष महेश भोये, उपाध्यक्ष मनोज गवते, रवींद्र थेतले, दिनेश जाधव, अमित घेगड, रमेश हांडवा, सागर सातपूते , अजय शेळकदे उपस्थित होते. सैन्य पोलीस भरतीपुर्व केंद्राची इमारत प्रशस्त बांधण्यात आली असली तरीही अपुऱ्या सुविधांमुळे ती दोन वर्षे पडीक राहिली होती. तशाच अपुऱ्या सुविधांसह प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. मात्र तेथे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना लांबुन स्वत: पाणी घेऊन यावे लागते. गणवेश, बुट, दोन जोडी मोजे, टोपी यासाठी शासनाकडून फक्त पन्नास रूपये निधी येत असुन यात मोज्यांच्या जोडी देखील खरेदी होत नाहीत. प्रशिक्षणार्थींना सकस आहार देखील मिळत नाही. प्रशिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना तटपुंज्या मानधनावर गुजारा करावा लागत आहे. २०० विद्यार्थी क्षमता असतांना केवळ १०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. अशा समस्या मोर्चेकऱ्यांनी मांडल्या.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा