दिनांक 06 April 2020 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » घोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार

घोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार

Wadaवाडा, दि. 22: तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायतीचा मनमानी, नियमबाह्य व भ्रष्ट कारभार सुरु असल्याचा आरोप करीत या कारभाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य विकास घरत यांनी पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे एका तक्रारी द्वारे केली आहे.

त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, घोणसई ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरु असून या कारभारामुळे ग्रामपंचायतीने शासकीय नियम धाब्यावर बसवले आहेत. या ग्रामपंचायतीत ग्रामनिधीतून विकास कामे करण्यात आली आहेत. ही विकासकामे करताना खाजगी जागेत कामे करण्यात आली आहेत. मेट येथील एका बंगल्याच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून बंगल्याच्या सभोवताली संरक्षक भिंत असताना सुद्धा आवारात पेव्हर ब्लॉक मारून शासनाच्या नियमांचा भंग केला आहे. या कामासाठी एक लाख 98 हजार 984 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कामासाठीचा ठराव 21 फेब्रुवारी 2015 रोजी झालेल्या मासिक सभेत घेण्यात आला. पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून मे 2016 मध्ये म्हणजेच 15 महिन्यानंतर त्याचे अंदाजपत्रक बनवून घेतले. त्यानंतर एप्रिल मे 2018 मध्ये ही कामे पूर्ण करण्यात आली. म्हणजेच ठराव घेणे, अंदाजपत्रके बनवणे व काम करणे यासाठी एक एक वर्षाचा कालावधी घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्याला ग्रामपंचायतीचा लाभ घेता येत नसल्याचा नियम आहे असे असताना सुद्धा एका सदस्याच्या अंगणात सिमेंट क्रॉकीटीकरणाचे काम करण्यात आले आहे. या कामासाठी 95 हजार 907 रुपयांचा निधी खर्च केला गेला आहे. त्याचप्रमाणे आणखी एका नागरिकाच्या अंगणात पेव्हर ब्लॉक बसवून 1 लाख 11 हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीत अनेक आदिवासी पाड्यात अद्याप रस्ते, पाणी पिण्याच्या सुविधा नसतांना एका बंगल्याच्या आवारात काम करणे कितपत योग्य आहे? असा सवाल विकास घरत यांनी तक्रारीत केला आहे.

ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचाने जुलै 2017 रोजी राजीनामा दिल्यानंतर तो मंजूर करण्यात आला असतानाही त्या सरपंचाने एका महिन्यानंतर म्हणजेच ऑगस्ट महिन्यात धनादेश संबंधिताना देऊन आपल्या पदाचा दुरूपयोग केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्यांनी उपस्थित केलेला विषय त्यानुसार न मांडता आपल्या मर्जीप्रमाणे लिहीले जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. कॅशबुक, पासबुक व इतर कागदपत्रे यांची मागणी मासिक सभेत केली असता ती दाखवली जात नाहीत. असा आरोप आहे. घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या ’भारतीय मेट क्राफ्ट’ या कंपनीने एम एस इंगोट प्लॅन्ट टाकण्यास ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. कंपनीने अर्ज दिल्यानंतर 26 जुलै 2018 च्या मासिक सभेत यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत कंपनीची सुमारे 7 लाख रूपये घरपट्टी थकीत असल्यामुळे घरपट्टी वसूल करून कंपनीला ना हरकत दाखला देण्यात यावा असा सर्वानुमते ठराव घेण्यात आला. मात्र त्यानंतर दोनच दिवसांतच कंपनीला ना हरकत दाखला देण्यात आला.

ग्रामपंचायतीने सुचवलेल्या विकास कामांचे अंदाजपत्रक बनविण्याचे काम बांधकाम विभागाकडून करण्यात येत असून शाखा अभियंता यु. व्ही. डबेटवार हे या बीटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अंदाजपत्रके देताना ते जागेवर न जाताच कार्यालयात बसून अंदाजपत्रके देऊन ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शन तत्वांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरु असून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी नियम पायदळी तुडवले आहेत. ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे निविदा, ई निविदा, जाहीर नोटीस, कोटेशन दर, प्रशासकीय मंजुरी, कार्यारंभ आदेश आदी कामे करण्यासाठी लागणारी कागदपत्रे नसल्याने ही कामेच अनधिकृतरित्या केली असल्याचा आरोप विकास घरत यांनी तक्रारीत केला असून चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत केली आहे.

अधिकार्‍यांच्या भुमिकेत विरोधाभास

वाडा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेने ग्रामपंचायत घोणसई अंतर्गत एका खाजगी व्यक्तीच्या बंगल्याच्या आवारात केलेल्या कामाच्या बाबतीत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येते. या प्रकरणासंदर्भात शाखा अभियंता यु. व्ही. डबेटवार यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत ही स्वायत संस्था असल्याने आपल्या स्व निधीचा ते कुठेही वापर करू शकतात असे सांगितले. तर याच विभागाचे उपअभियंता धनंजय जाधव यांच्याशी संपर्क साधाला असता खासगी जागेत अशी कामे करता येत नाहीत. पंरतु या प्रकरणात प्रत्यक्ष पाहणी करून माहिती देता येईल असे सांगितल्याने बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांमध्येच विरोधाभास असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत सदस्याने जिल्हा स्तरावर तक्रार केली असून त्याबाबत चौकशीचे पत्र आल्यानंतर तातडीने चौकशी करून अहवाल सादर करू असे सांगितले.

मी दीड महिन्यापासूनच या ग्रामपंचायतीचा पदभार स्विकारला आहे. आपल्या कार्यकाळातील काम नसल्याने कागदपत्रांची पाहणी करून माहिती देता येईल.
– पंकज चौधरी
प्रभारी ग्रामसेवक
ग्रामपंचायत घोणसई

तत्कालीन ग्रामसेविका कल्याणी पाटील या रजेवर असून त्यांना अनेक वेळा दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top