खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक, 2 गावठी पिस्तुल व 1 कट्टा हस्तगत, पालघर स्थानिक गुन्हे शाखेची वसईत कारवाइ

0
12

VASAI AAROPI ATAKराजतंत्र न्युज नेटवर्क
वसई, दि. 13 : खुनाच्या गुन्ह्यातील 2 फरार आरोपींसह त्यांच्या एका साथिदाराला अटक करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असुन या आरोपींकडून 2 गावठी पिस्तुल व एक गावठी कट्टा अशी हत्यारे जप्त करण्यात आला आहे. आशुतोष जितेंद्र मिश्रा (वय 23), दिपक बलवान मलीक (वय 18) व शिवम ओमप्रकाश तिवारी (वय 19) अशी सदर आरोपींची नावे असुन आशुतोष मिश्रा व दिपक मलीक हे दोघे उत्तर प्रदेशातील महाकाल या गुन्हेगारी गँगमध्ये सक्रिय असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरिक्षक हितेंद्र विचारे यांना वालीव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल असलेले आशुतोष मिश्रा व दिपक मलीक वसई पुर्वेतील चिंचोटी भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांच्या एका पथकाने या भागात सापळा रचला असता आशुतोष मिश्रा, दिपक मलीक व त्यांचा साथिदार शिवम तिवारी एका दुचाकीवरुन येताना दिसले. यावेळी त्यांना पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला असता पोलीसांवर हल्ला करुन त्यांनी तिथून पळ काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. या हल्ल्यात शरद पाटील व अमोल कोरे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी पिस्तुल व एक गावठी कट्टा अशी हत्यारे आढळून आली. यानंतर पोलीसांनी हत्यारे हस्तगत करुन तिघांनाही अटक केली.

अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असुन यातील आशुतोष मिश्रा व शिवम तिवारी हे मुळचे उत्तर प्रदेशच्या भदोई जिल्ह्यातील रहिवासी असुन सध्या वसई पुर्वेत वास्तव्यास होते. तर दिपक मलीक हा हरयाणा राज्यातील कुरुक्षेत्र भागातील रहिवासी असुन सध्या विरार पुर्व भागात वास्तव्यास होता.

आशुतोष मिश्रा व दिपक बलवान यांच्याविरोधात वसई तालुक्यासह उत्तर प्रदेशातील अनेक भागात हत्या व चोर्‍यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असुन ते उत्तर प्रदेशातील महाकाल गँगमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस निरिक्षक जितेंद्र वनकोटी, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रताप दराडे, पोलीस उप निरिक्षक हितेंद्र विचारे पोलीस उप निरिक्षक महादेव पाठक व चंद्रकात कदम, जर्नादन मते, विकास यादव, रमेश अलदार, मुकेश तटकरे, प्रशांत ठाकूर, सागर बारवकर, गोविंद केंद्रे, शरद पाटील आदी पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गावठी कट्टे विक्रसाठी आलेल्या चौघांना अटक
नालासोपारा, दि. 13 : नालासोपार्‍यातील गौराई पाडा भागात गावठी कट्टे विकण्यासाठी आलेल्या रोहीत पांडे नामक इसमासह त्याच्या तीन साथिदारांना पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या याच पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून 25 हजार 800 रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असुन त्यांच्याविरोधात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments