दिनांक 21 May 2019 वेळ 12:57 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ऐन दुष्काळात पाण्यासाठी रुरल मेनिया संस्थेकडून वॉटर व्हीलचे वाटप!

ऐन दुष्काळात पाण्यासाठी रुरल मेनिया संस्थेकडून वॉटर व्हीलचे वाटप!

JAWHAR WATERWHEELप्रतिनिधी
जव्हार, दि. 10 : गेली दोन वर्षे जिल्हाभरात मुबलक पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळ हा शब्द जनतेला आठवला नाही. यंदा मात्र पावसाने दुष्काळाची आठवण करून दिल्याने जिल्ह्यातील जनतेचा घसा कोरडा होत असून या पार्श्‍वभुमीवर तालुक्यात रुरल मेनिया या संस्थेच्या माध्यमातून नागरीकांची तहान भागविली जात आहे.
रुरल मेनिया संस्थेच्या अध्यक्षा मालती राय यांनी जव्हार तालुक्यातील केळीचापाडा, आळीवमाळ, आपटळे व चोथ्याचीवाडी ही चार गावे दत्तक घेतली असून या गावांसाठी 35 वॉटरव्हीलचे वाटप केले आहे. तसेच आणखी 65 वॉटरव्हील वाटप करण्यात येणार आहेत. यंदा पाऊस कमी झाल्याने पालघर जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसली आहे. जव्हार तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई भासू लागली आहे. अनेक गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या कोणत्याही योजना नसल्याने गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. गावातील महिला आणि बालके गावापासून दोन ते तीन किलोमीटरवरून चालत जाऊन पाणी आणतात. डोक्यावर पाण्याचे दोन हंडे व कमरेवर एक हंडा अशा परिस्थितीत गावातील महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्या कारणाने त्यांना मानेचे व कमरेचे विकार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिकच गडद होऊ लागल्या आहेत. जव्हार तालुक्यातील जनतेचा घसा कोरडा होत असून त्यांना रुरल मेनिया या संस्थेचा मोठा आधार वाटू लागला आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक पाणी साठा करण्यासाठी गावकर्‍यांना पंधरा टँकर देण्यात आले आहेत.
यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे गावामध्ये जवळपास कुठेही पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने आम्हाला दूरवरून पाणी आणावे लागत होते. परंतु रुरल मेनिया या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला वॉटरव्हील मिळाल्याने दूरवरून पाणी आणणे सोपे झाले आहे.
– ललीत ठोंबरे,
नागरिक
यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे गावातील महिला व बालकांना दूरवरून पाणी आणावे लागत होते. आमच्या संस्थेच्या माध्यमातून गावकर्‍यांना वॉटरव्हीलचे वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना पाणी आणणे सोपे झाले आहे. तसेच आणखी काही गावांमध्ये वॉटरव्हील वाटप करण्यात येणार आहे.
– मालती राय,
अध्यक्षा, रुरल मेनिया संस्था
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top