दिनांक 20 March 2019 वेळ 8:53 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश

अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश

ALPASANKHYANK SAMAJराजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर, दि. 10 : केंद्र तसेच राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी या योजनांचा अधिकाधिक
लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले.
शेख हे आज पालघर जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी शासनामार्फत राबविल्या जाणार्‍या विविध योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, जिल्हा नियोजन अधिकारी गोपाल भारती, अध्यक्षांचे खाजगी सचिव सुरवसे यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी शेख यांनी विविध अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
शेख म्हणाले, ज्या योजना राबविण्यात अडचणी येत असतील त्याबाबत आयोगाला कळविल्यास त्यावर मार्ग काढला जाईल तसेच ज्या प्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक असेल त्यासाठी आयोगामार्फत शिफारस करण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजासाठी राबविल्या जाणार्‍या विविध योजनांचा आढावा घेतला जात असून या योजनांच्या अंमलबजावणी बाबतची सद्यस्थिती मुख्यमंत्र्यांकडे सादर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वक्फ बोर्डाला दिलेली जमीन ही दान केलेली जमीन असते त्यामुळे त्यावर अतिक्रमण करणार्‍यांविरोधात तसेच अल्पसंख्याकांसंदर्भात विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा मजकूर पसरविणार्‍या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी महिला व बालविकास, शिक्षण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास, ग्रामविकास, पोलीस, अग्रणी बँक अशा विविध यंत्रणांच्या प्रमुखांकडून योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती जाणून घेतली. अल्पसंख्याक संस्थांना दिले जाणारे अनुदान, ज्यासाठी अनुदान दिले जाते त्यासाठी त्याचा वापर होत असल्याची तपासणी करणे, मदरसांसाठी योजना, पोलीस भरतीसाठीचे प्रशिक्षण, मोहल्ला कमिटी तसेच शांतता कमिटीच्या बैठका, बँकांमार्फत अल्पसंख्याक समाजासाठी दिले जाणारे कर्ज आदींबाबत मार्गदर्शन केले.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top