दिनांक 17 February 2020 वेळ 11:46 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ

कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ

>> पालघरमधील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल

PALGHAR SHASKIY VASTIGRUHवार्ताहर/बोईसर, दि. 1 : पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना ऐन थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करावी लागत आहे. तर मुलींच्या वसतिगृहाच्या खिडक्यांच्या काचा तुटल्याने संपुर्ण रात्र डासांचा सामना करून मुलींना रात्र घालवावी लागत आहे. आदिवासी विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील विद्यार्थ्यांना मोठे हाल सहन करुन शिक्षण घ्यावे लागत असल्याने विभागाने येथे गरम पाण्याची सोय तसेच आवश्यक तेथे वसतिगृहाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेल्या बिडको येथे मुलींचे व मुलांचे वसतिगृह 2005 सालापासून कार्यरत आहे. मुलींच्या वसतिगृहामध्ये 78 मुली तर मुलांच्या वसतिगृहामध्ये 120 मुले निवासी राहून शिक्षण घेत आहेत. मात्र येथे आजही अनेक सोयी-सुविधांचा तुटवडा असुन गरीब व गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना इतर पर्यायाअभावी येथे शिक्षण घ्यावे लागत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत येथील विद्यार्थी थंड पाण्याने अंघोळ करत आहेत. तसेच वसतिगृहाच्या इमारतीच्या खिडक्यांना लावण्यात आलेल्या काचा तुटल्या असून पडदे व कपड्यांनी खिडक्या झाकून मुली राहात आहेत. तर खिडक्या नसल्याने रात्रभर डासांशी सामना करत झोप काढावी लागत आहे. येथील गृहपाल धनराज शिंदे यांना याबाबत विचारले असता गरम पाण्याकरिता सोलार वॉटर हिटरची सुविधा वसतिगृहासाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र येथील पाण्यात क्षार जास्त असल्याने यंत्र गेले अनेक वर्ष बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक खेड्यापाड्यातील पालक आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आपल्या मुलांना शिक्षणाच्या सोयीसाठी शासकिय वसतिगृहात राहायला पाठवतात. पैशांअभावी खाजगी हॉस्टेल्समध्ये राहता येत नसल्याने हे विद्यार्थीही शिक्षण मिळावे म्हणून जे मिळेल त्यावर भागवून शिक्षण घेत असतात. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच खुद्द राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा पालघर जिल्ह्याचे असताना देखील त्यांनी येथील वसतिगृहांना कधी भेट दिली की नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. आपल्या समाजाची मुलं या वसतिगृहामध्ये शिकत आहेत. त्यांना येथे कोणत्या अडचणी आहेत की नाही, हे विचारण्याची फुरसत पालकमंत्र्यांना कधी मिळाली नसल्याचे वसतिगृहांच्या दयनिय अवस्थेवरुन दिसून येते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या या वसतिगृहाकडे कोणताही लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याने खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वसतिगृहाची अशी अवस्था असताना खेड्यापाड्यातील वसतिगृहांची अवस्था कशी असेल? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top