खोडाळा मंडळ कृषी कार्यालय कायम कुलूपबंद: कास्तकारांचे हाल, शेतकरी जातात विन्मूख, जलयुक्त शिवार वार्‍यावर

0
9

 

KHODALA MANDAL KRUSHI KARRYALAYप्रतिनिधी
मोखाडा, दि. 19 : खोडाळा येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय कायम कुलूपबंद राहत असल्याने विविध कामांसाठी कार्यालय गाठणार्‍या खोडाळा आणि परिसरातील गावपाड्यातील शेतकर्‍यांना प्रचंड त्रास होत आहे. येथे साधा शिपाई देखील हजर राहत नसल्याने शेतकर्‍यांना शंकानिरसन न होताच विन्मूख परतावे लागत असून कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराची दाद मागायची तरी कोणाकडे? असा प्रश्‍न सर्वसामान्य शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

मोखाडा तालुक्यातील खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय हे एक महत्वाचे कार्यालय आहे. याठिकाणी खोडाळा विभागातील 50 हून अधिक गांवपाड्यातील शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. शेतीसंबंधी तक्रारी, रोजगार, विविध अनुदान योजना, अशी असंख्य कामे घेऊन 15 ते 20 किलो मीटरहून गरीब दुबळा शेतकरी येथे नित्यनेमाने येत असतो. तथापि मुळ कार्यालयच कुलूपबंद रहात असल्याने शेतकर्‍यांना अक्षरशः हात हलवत परतावे लागत आहे.

खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे 1 मंडळ कृषी अधिकारी, 2 पैकी 1 कृषी पर्यवेक्षक, 12 कृषी सहाय्यक, एक आरेखक व शिपाई एवढ्या मोठ्या संख्येचा लवाजमा आहे. तथापि शेतकर्‍यांच्या जुजबी कामांसाठी एकही कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाही. तर दुरध्वनीहून संपर्क साधल्यास एकतर उपलब्धच होत नाही आणि झालेच तरी थातूरमातूर उत्तरे ऐकायला लागत असल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे.

अशा अनागोंदी कारभारामुळे जलयुक्त शिवार योजना, कृषी वार्ताफलक, मनरेगाची कामे, गावभेटीचे वार याबाबत कोणताच ताळमेळ लागत नाही. बहूतांश ठिकाणी कृषी वार्ताफलकाच्या पाट्या कोर्‍याच आहेत. त्यामुळे त्यावर नमूद कराव्या लागणार्‍या कृषी कर्मचार्‍याचे नाव व गावभेटीचा वार याची सुतराम कल्पना शेतकर्‍यांना मिळत नाही. त्यामुळे एकूण व्यवस्थाच रामभरोसे झाल्याचे चित्र आहे. याबाबत खोडाळा मंडळ कृषी अधिकारी आकाश साळुंखे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी यावर साचेबद्ध उत्तर देऊन वेळ मारून नेली. त्यामुळे शेतकर्‍यांनी आत्ता कोणाकडे दाद मागायची? असा प्रश्‍न विचारला जात आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कृषी विभागाला जनतेच्या, प्रामुख्याने मजुरांच्या व कास्तकारांच्या व्यापक रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे चिन्ह आहे.

महाराष्ट्र सरकार एकीकडे जलयुक्त शिवार व तत्सम पाणीपुरवठ्याच्या कामांवर कटाक्षाने लक्ष देत असताना अंमलबजावणी दाखल असणार्‍या यंत्रणांकडून त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे कृषी विभागाच्या हलगर्जीपणावरून स्पष्ट होत आहे. शेतकर्‍यांना आता खरी कामाची गरज असताना अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांना गाव सोडून परदेशी व्हावे लागत आहे. याची सर्वच यंत्रणांनी दखल घेऊन तातडीने सुधारणा करावी.

रघुविर झुगरे,
शेतकरी, सायदे

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments