दिनांक 23 February 2019 वेळ 9:15 PM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न!

पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न!

ॠषितुल्य वा. ना. अभ्यंकर व संस्कृती संवर्धन मंडळ ठरले पहिले मानकरी

राजतंत्र मिडीया नेटवर्क

1 No. IMPदेशातील पहिल्या बालशिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक व त्यांचा बालशिक्षणाचा वारसा पुढे नेणार्‍या पद्मश्री अनुताई वाघ यांच्या नावे नूतन बाल शिक्षण संघाच्या वतीने जाहिर करण्यात आलेले स्मृती पुरस्कार स्व. ताराबाईंच्या जयंती दिनाचे (19 एप्रिल) औचित्य साधून पूणे येथे आयोजीत करण्यात आलेल्या एका शानदार समारंभात प्रदान करण्यात आले. वैयक्तीक पातळीवर पुण्यातील निगडी प्राधिकरण येथे गुरुकूल पद्धतीने शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणारे वामन नारायण अभ्यंकर व संस्थात्मक पातळीवर नांदेड जिल्ह्यातील सगरोळी येथे कार्यरत संस्कृती संवर्धन मंडळ यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सभागृहात पार पडलेल्या या समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध शिक्षणतज्ञ मीना चंदावरकर व मुंबईतील रुईया महाविद्यालयांच्या माजी मराठी विभाग प्रमुख मीना गोखले उपस्थित होत्या.

ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी नूतन बाल शिक्षण संघाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यासारख्या ग्रामीण व आदिवासी बहुल क्षेत्रात बाल शिक्षणाचा पाया घातला. स्थानिक लोकांच्या गरजा ओळखून त्यांच्या वातावरणाला अनुरुप शैक्षणिक संकल्पना राबवून पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी प्रयोगसिद्ध केलेल्या बालवाडी, अंगणवाडी, कुरणशाळा या संकल्पना आता प्रचलीत शिक्षणपद्धतीचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. त्यांच्या या मौलिक कार्याची ओळख सर्वदूर व्हावी व या संकल्पनांचा प्रसार व्हावा, असेच कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नूतन बाल शिक्षण संघ, कोसबाड हिल (डहाणू) संस्थेतर्फे दरवर्षी शिक्षणक्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या व्यक्ती व संस्था यांना पुरस्काराने गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 25 हजार रुपये रक्कम व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून ज्येष्ठ पत्रकार तथा राज्याचे माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर व मॉडर्न महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अ. गो. गोसावी यांनी पुरस्कार निवडसमितीचे काम पाहिले. नूतन बाल शिक्षण संघाचे विश्‍वस्त, ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश करंदीकर यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. संघाच्या उपाध्यक्षा सौ. संध्या करंदीकर यांच्या हस्ते मान्यवर अतिथींचा सत्कार करण्यात आला.

आपल्या सत्काराला उत्तर देताना श्री अभ्यंकर यांनी आपल्या पंचेद्रियांचा विकास करुन त्याद्वारे आत्मविकास व समाजविकास साधावा. तसेच शिक्षण पद्धतीने रुढींमध्ये अडकून न पडता काळानुरुप संकल्पना व पद्धतीचा स्विकार करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. तर संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रात घुसलेल्या अशास्त्रीय संकल्पनांचा समाचार घेतला.

यावेळी बोलताना शिक्षणाचे माध्यम कुठलेही असले तरी शिक्षणाची आपल्या संस्कृतीशी सांगड घालणे आवश्यक असल्याचे विचार डॉ. मीना गोखले यांनी मांडले. तर शिक्षकाने शरीर, विचार व भावना या बाबतीत बालकेंद्रीत असावे असा सल्ला मीनाताई चंदावरकर यांनी दिला. नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती करुन देत कोसबाड येथे संकल्पीत नवीन प्रकल्पांची माहिती उपस्थितांना करुन दिली.

कार्यक्रमाची प्रस्तावना अरुणा एरंडे यांनी केली तर सुत्रसंचालन गंधाली दिवेकर यांनी केले. अशोक पाटील व प्रदिप राऊत यांनी पुरस्कार्थींना देण्यात येणार्‍या मानपत्रांचे वाचन केले. दिनेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top