दिनांक 22 August 2019 वेळ 3:10 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » आदिवासी भागातील ग्रामसभांकडे विकास यंत्रणांची पाठ

आदिवासी भागातील ग्रामसभांकडे विकास यंत्रणांची पाठ

MOKHADA NEWS>> अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे ग्रामविकासाला खिळ

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : भारतीय शासन व्यवस्थेत ग्रामसभेचे स्थान महत्वपूर्ण आहे. त्यात ग्रामीण आदिवासीबहूल भागातील ग्रामसभांचे स्थान तर अनन्य साधारण आहे. लोकशाही प्रणालीत ग्रामसभेचे अस्तित्व हे घटनात्मक दर्जा देऊन संविधानात्मक दृष्ट्या अधोरेखीत करण्यात आले आहे. मात्र असे असताना ग्रामविकासातील दुवा असणार्‍या विकास यंत्रणांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याने ग्रामविकासाला खिळ बसलेली आहे.

गांव कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, कृषी अधिकारी, वनविभाग, पोलीस ठाण्याचे अधिकारी, लघू पाटबंधारे, सहकारी संस्थेचे व्यवस्थापक यांनी ग्रामसभांना उपस्थित रहाण्याचे निर्देश आहेत. परंतू यापैकी विकास यंत्रणांच्या 90 टक्के कर्मचारी-अधिकार्‍यांकडून खुद्द या घटनात्मक व्यवस्थेची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. शासन आणि प्रशासन व्यवस्था ग्रामसभेबाबत आणि तिच्या अधिकाराबाबत तितकीशी गंभीर नसल्याने व अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे शासकिय योजना प्रसृत न होता लालफितीत अडकत असल्यामुळे ग्रामीण भाग विकासापासुन कोसो दुर राहिला आहे.

लोकसभा, विधानसभा तशी तितकीच तुल्यबळ ग्रामसभा आहे. तुच तुझ्या जीवनाची शिल्पकार या न्यायाने ग्रामविकासाबाबत सर्वतोपरी निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामसभेला बहाल करण्यात आलेले आहेत. विकास यंत्रणांच्या ग्रामसभेतील अनुपस्थिती विषयी शिस्तभंगाच्या कारवाईबाबत त्यांच्या वरिष्ठांना कळविण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत. तथापी अशा शिस्तविषक नियंत्रणाची कल्पनाच ग्रामसभांना नसल्याने कसूरदार यंत्रणांचे फावत आहे.

याबाबत प्रातिनिधीक स्वरूपात खोडाळा ग्रामसभेचे मत विचारात घेतले असता, ग्रामसभांचा अजेंडा देऊनही कोणत्याही यंत्रणांचे अधिकारी ग्रामसभांना हजर राहात नाहीत. परिणामी विकासकामांबाबत व अंमलबजावणी बाबतची भुमिका स्पष्ट होत नाही. त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालघर जिल्हाधिकार्‍यांकडे केली असल्याचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी सांगितले.

ग्रामसभेच्या नोटीसा देऊनही सभेस उपस्थित न राहणार्‍या अधिकार्‍यांवर वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनातून योग्य ती कारवाई करण्यात येईल व वेळोवेळी आढावा घेण्यात येईल.
-संगीता भांगरे -डहाळे
गटविकास अधिकारी,  मोखाडा

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

 

comments

About Rajtantra

Scroll To Top