भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांवर शिवसेनेचा अणुशक्ती केंद्रावर धडक मोर्चा

0
11

SHIVSENA ANUSHAKTI KENDRA MORCHA1वार्ताहर/दि. 10 : बंदिस्त अशा प्रकल्पामध्ये सुरक्षेचे नाव पुढे करुन मनमानी कारभार करत असाल तर तुमचा हा डाव शिवसेना उधळून लावणार, असा इशारा खासदार गजानन कीर्तिकर यांनी तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्र प्रशासनाला दिला आहे. स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांवर आज शिवसेना व स्थानिक लोकाधिकार समितीतर्फे तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्रावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना कीर्तिकर बोलत होते.

स्थानिकांना व प्रकल्प पीडितांना प्रकल्पात शाश्‍वत नोकरीमध्ये समावून घेण्यात यावे, अनुकंपा तत्त्वावरील स्थानिकांना भरपाईची योग्य रक्कम देण्यात यावी, कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे यांसह अनेक मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणार्‍या पाचमार्ग येथील रस्त्यावर स्थानिक लोकाधिकार समिती तसेच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढण्यात आला. येथे मोर्चाचे सभेत रुपांतरण होऊन खासदार गजानन कीर्तिकर व अनिल देसाई यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. बंदिस्त अशा प्रकल्पामध्ये सुरक्षेचे नाव पुढे करुन मनमानी कारभार करत असाल तर तुमचा हा डाव शिवसेना उधळून लावणार असा इशारा देतानाच स्थानिकांना अनुकंपा तत्वावर मिळणारी भरपाई पाच लाखांवरून तीस लाखापर्यंत करण्यात आली आहे. मात्र त्याचा लाभ येथील स्थानिक व प्रकल्पग्रस्तांना मिळत नसून भरपाईपासुन वंचित असलेल्यांची यादी तयार करून हा विषय संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रखरतेने मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी यावेळी सांगितले.

तर स्थानिक व प्रकल्पग्रस्तांना अणुऊर्जा प्रकल्पामध्ये स्थान मिळावे यासाठी प्रकल्पातील पदाधिकार्‍यांशी अनेकदा झालेल्या चर्चा व बैठकांमध्ये केवळ आश्वासने मिळाली असुन अनुकंपा तत्वावरील भरती संदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित असताना प्रकल्प व्यवस्थापनाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप अनिल देसाई यांनी केला.

SHIVSENA ANUSHAKTI KENDRA MORCHAयावेळी शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, आमदार विलास पोतनीस, स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष बापू पाटील, जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख उदय पाटील, आमदार अमित घोडा, कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, पालघर लोकसभा समन्वयक प्रभाकर राऊळ, पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, पालघर विधान सभा संपर्क रमाकांत रात, उपजिल्हा प्रमुख राजेश कुटे, पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, उपजिल्हा प्रमुख श्वेता देसले, पालघर विधानसभा महिला संघटक संगिता मोरे, तालुका प्रमुख विकास मोरे, पंचायत समिती सदस्या मनीषा पिंपळे, उपसभापती मेघन पाटील, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुते, जिल्हा युवती दीक्षा संखे आदींसह शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, यूवा अधिकारी तसेच स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्‍वभुमीवर तारापूर अणुशक्ती केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वार सुरक्षा रक्षक व पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर येथील कर्मचार्‍यांसाठी असलेली बससेवा व अणुशक्ती केंद्रातील वसाहतीमधील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments