दिनांक 05 December 2019 वेळ 8:03 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे! – विजय खरपडे

शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे! – विजय खरपडे

> जागतिक मृदा दिनानिमित्त कोसबाड हिल कृषि विज्ञान केंद्रात कार्यक्रम संपन्न

> जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण

KOSBAD HIL KARYAKRAMRajtantra Media/डहाणू, दि. 7 : रासायनिक खतांच्या वापरामुळे पीक उत्पादनात वृध्दी होते हे जरी खरे असले तरी अशा प्रकारचे अन्न सेवन केल्याने मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. जमिनी नापीक होऊन प्रदुषित होत आहेत. यावर उपााय म्हणून शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित जागतिक मृदा दिन कार्यक्रमात व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, सेंद्रीय खत उत्पादनासाठी गायी गुरांचे शेण, गोमूत्र, कोंबड्या, शेळ्या आदींच्या विष्ठांचा वापर करून कंपोस्ट खत तसेच गांडूळ खत तयार केले पाहिजे. त्यामुळे जमीन सुपिक होण्यास निश्‍चित मदत होईल. शेती क्षेत्रात महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे असे सांगतानाच यासाठी बचत गटामार्फत जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिला सक्षमीकरणास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील ओसरवीरा गावातील शेतकर्‍यांचे उदाहरण देतानाच गटशेतीचे व त्याद्वारे उत्तम विक्री व्यवस्थापन करता येते हे सांगून जिल्ह्यातील आदिवासींचे स्थलांतर रोखण्यास फायदेशीर मोगरा लागवड व गटामार्फत विक्री या उपक्रमांची मदत झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पालघर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. एम. चांदवडे यांनी यावेळी आत्माच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेती गट तयार करण्याचे आवाहन केले. तसेच डहाणू तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी कृषी विभागातर्फे राबविण्यात येणार्‍या जमिन आरोग्य पत्रिका कार्यक्रमाबाबत माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील सुमारे 5500 शेतकर्‍यांना जमिन आरोग्य पत्रिका दिल्याचे त्यांनी नमूद केले. पवार यांनी उपस्थितांना कृषी विभागाच्या विविध योजनांची अभ्यासपूर्ण माहिती देऊन संबंधीत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पालघर संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. ढाणे यांनी विद्यापीठाच्या संशोधन कार्याबाबत माहिती देऊन आदिवासी शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी एकात्मिक शेती पध्दतीचे अवलंबन करावे, असे सुचविले. तर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अशोक भोईर यांनी मृदा आरोग्य पत्रिकेचे वाचन कसे करावे तसेच सेंद्रीय शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. चिंबाबे गावचे सरपंच जयेश डोंगरकर, सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. क्लेमेंटाईन रिबेलो, आरोहन संस्थेचे संचालक साळवे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक बारी यांनीही समयोचित भाषणे दिली.

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विलास जाधव यांनी केंद्राच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन केंद्र आयोजित करत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मान्यवरांच्या हस्ते मृदा पत्रिकेचे वितरण करण्यात आले. तसेच आदिवासी उपयोजनेच्या महिला लाभार्थ्यांना भाजीपाला रोपे देण्यात आली.

कार्यक्रमास पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे व आभार प्रदर्शन रूपाली देशमुख यांनी केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top