दिनांक 26 May 2020 वेळ 8:23 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » प्रलंबित देयके अदा करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!

प्रलंबित देयके अदा करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!

>> निवृत्त शिक्षण विस्तार अधिकार्‍याचा टाहो
>> थेट शिक्षण मंत्र्यांनाच घातले गार्‍हाणे
>> तब्बल 9 वर्षांपासून देयके प्रलंबित
>> शिक्षण विभागाची लोकायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

 दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 4 : शासनदरबारी प्रलंबित असलेली देयके मिळावी म्हणून वारंवार हेलपाटे मारूनही जिल्हा स्तरावरून सकारात्मक प्रयत्न होत नसल्याने मेटाकुटीस आलेल्या तालुक्यातील सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मोहनदास विश्राम देवरे यांनी प्रलंबित बिले द्या, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. त्यामुळे जिल्हा शिक्षण विभागाची चालढकल प्रवृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

मोखाडा पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेले मोहनदास देवरे सन 2009 साली सेवा निवृत्त झाले आहेत. मात्र त्यांचे रजा रोखीकरणाचे 3 लाख 44 हजार 400 रूपये, 5 व्या वेतन आयोगाच्या फरकाचे 1 लाख 72 हजार 878 रूपये व 6 व्या वेतन आयोगाच्या फरकाचे 3 लाख 26 हजार 906 रुपये असे एकूण 8 लाख 44 हजार 184 रुपयांची देयके जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढूपणामूळे शासनाकडे प्रलंबित आहेत. देवरे यांची ह्रदय शस्रक्रिया झालेली आहे. त्यात मुलांचे शिक्षण, कौटूंबिक खर्च, आजारपणावरील खर्च निवृत्ती वेतनावर भागत नसल्याने कर्जबाजारी झालो असून घेणेकर्‍यांच्या तगाद्यामुळे बाहेर फिरनेही दुरापास्त झाले असल्याचे त्यांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच प्रलंबित देयकांच्या सादरीकरणाबरोबरच देयकांच्या मागणीसाठी मोखाडा आणि पालघर शिक्षणाधिकारी कार्यालयात शेकडो हेलपाटे मारूनही पदरी काहीच पडत नसल्याने आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याची हतलबता त्यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

दरम्यान, देवरे यांची थकीत देयके त्वरीत अदा करण्याचे लोकायुक्तांचे आदेश असतानाही या आदेशाकडे सोयीस्करपणे कानाडोळा करून लोकायुक्तांच्या आदेशालाही जिल्हा शिक्षण विभागाने धाब्यावर बसविल्याचे दिसत आहे.

24 डिसेंबर 2018 पूर्वी शासनाकडे प्रलंबित असलेल्या देयकांबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव पालघर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा देवरे यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता देवरे यांच्या थकीत देयकांबाबत आवश्यक ती चौकशी करून लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना देत असल्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी सांगितले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top