प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : शहरातील अशोकवन या प्रतिष्ठित मानल्या जाणार्या भागातील अशोकलीला या इमारतीतील सदनिकाधारकांची मानसिक छळवणूक व फसवणूक केल्याप्रकरणी सदनिकाधारकांच्या तक्रारीवरुन विकासक विकास जाधव यांच्यावर महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायदा अर्थात मोफा अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
वाडा शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या मागे अशोकवन हा नावाजलेला भाग आहे. या भागात अशोकलीला ही इमारत 2012 पासून उभी असून इमारतीत 25 सदनिका आहेत. काही महिन्यांपुर्वी या इमारतीतील ग्राहकांनी सोसायटी नोंदणी करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र विकासक जाधव यांनी त्यासाठी कोणतेही सहकार्य आजपर्यंत केले नाही, याउलट इमारतीच्या पार्किंगमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातला ज्याला सदनिकाधारकांनी विरोध केला असता जाधव इमारतीतील महिलांना मारण्याच्या उद्देशाने खुर्च्या घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले. या गुंडगुरी प्रवृत्तीविरोधात जाधव यांच्या विरोधात वाडा पोलिसांत तक्रार दाखल केली असता त्यावेळी पोलीसांनी त्यांना समज देत सामंजस्य घडवून आणले होते.
मात्र हे प्रकरण थोडे शांत होताच जाधव यांनी मागील 6 वर्षांपासुन इमारतीला पाणी पुरवठा करणार्या बोअरवेलची वायर कापून नेली व त्यानंतर मोटार देखील काढून नेली. या प्रकाराने संतापलेल्या सदनिकाधारकांनी जाधव यांच्यावर मोफा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी वाडा पोलीस स्टेशन तसेच पालघर जिल्हाधिकार्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत अखेर काल, गुरुवारी विकास जाधव यांच्याविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 420, 406 व महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्याचे कलम 12(2), 12(3), 13(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!