दिनांक 21 February 2020 वेळ 12:49 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बंद पडलेल्या डिजिटल शाळांना पेसाने दिले जीवनदान

बंद पडलेल्या डिजिटल शाळांना पेसाने दिले जीवनदान

> आसे केंद्रातील 14 शाळांचे सौरउर्जेद्वारे विद्युतीकरण

MOKHADA DIGITAL SHALAदीपक गायकवाड/मोखाडा, दि. 28 : पालघर जिल्ह्यातील 2035 डिजीटल शाळांपैकी बहूतांश शाळांमध्ये थकित विजबिलांमुळे अंधाराचे साम्राज्य आहे. मात्र आसे ग्रामपंचायतीने यावर नामी उपाय काढत पेसाच्या निधीतुन शाळांना सोलर पॅनल देऊन बंद पडलेल्या डिजिटल यंत्र सामुग्रीला सौरउर्जेद्वारे जिवनदान दिले आहे. त्यामुळे येथील 14 शाळा पुन्हा झगमगाटल्या असुन अशाच प्रकारे निधीचा योग्य वापर केल्यास जिल्ह्यातील डिजिटल शाळांना पुनर्जीवित करणे शक्य होणार असल्याचे उदाहरणच ग्रामपंचायतीने या माध्यमातून दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील 2035 डिजीटल शाळांपैकी अनेक शाळा थकित विजबिलांमुळे अंधारात असल्याची बाब समोर आली होती. यात आसे जिल्हापरिषद केंद्रातीलही अनेक शाळांचा समावेश होता. त्यामुळे यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग आणि पेसा निधीची योग्य सांगड घालत केंद्रातील आसे, कुंडाचापाडा, स्वामीनगर, धामणी, पिंपळपाडा, दापटी, नावळ्याचापाडा, ईखरीचापाडा, धामोडी, बिवलपाडा, कुडवा, करोळी, राऊतपाडा आणि कुंभीपाडा अशा सर्वच 14 शाळांचे सौरउर्जेद्वारे विद्युतीकरण करून या शाळांमध्ये प्रकाश पसरवला आहे व या माध्यमातून जिल्ह्यापुढे एक नवा आदर्शही घालून दिला आहे. तर आसे पाठोपाठ बेरीस्ते ग्रामपंचायतीकडेही तेलीउंबरपाडा व आंब्याचापाडा येथील प्राथमिक शाळांकडून सोलर पॅनलसाठी प्रस्ताव सादर झाले असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बेरीस्ते ग्रामपंचायतीकडूनही लवकरच केंद्रातील सर्व शाळा सौरउर्जेवर लखलखतील होतील अशी चिन्हे आहेत.

राज्यात सर्वत्र सौरउर्जा व पवनउर्जेचा पुरस्कार होत आहे. महावितरणवरील विद्युतभार हलका होण्यासाठी सौरउर्जा व पवनउर्जा रामबाण ठरणार आहे. त्यामुळे मोखाडासारख्या अतिदुर्गम तालुक्यातील ग्रामपंचायती विशेष पुढाकाराने असे लक्षणिय उपक्रम राबवित आहेत ही बाब निश्चितच कौतूकास्पद आहे.

MOKHADA DIGITAL SHALA1पेसाच्या एकुण निधीतील 25 टक्के रक्कम शाळा सुधार, आरोग्य आदि स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी खर्च करण्याची तरतुद आहे. परंतू प्रामाणिकपणे योग्य तिथे या निधीची विल्हेवाट होताना दिसत नाही. मात्र आसे आणि बेरीस्ते ग्रामपंचायतींच्या धर्तीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पेसाबरोबरच 14 व्या वित्त आयोगाचे योग्य नियोजन करून प्राधान्यक्रमाने आपल्या हद्दीतील संपूर्ण शाळांचे सौरउर्जेवर विद्युतकरण केल्यास डिजिटल शाळांची अंधारयात्रा संपुष्टात येऊ शकते. पर्यायाने डिजिटल यंत्रसामुग्रीच्या उपकरणांचेही सुरक्षित जतन होऊन शासनाचा विजबिलांवर अनाठायी आणि अवाजवी होणारा खर्चही वाचणार आहे.

याबाबत मोखाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे-डहाळे यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांबरोबर सर्वच अंगणवाड्यामध्ये सोलर पॅनल बसवण्याची महत्वाकांक्षी योजना लवकरच हाती घेण्यात येणार असून मार्च अखेर शतप्रतिशत शाळा व अंगणवाड्या सौरउर्जेवर झालेल्या असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top