दिनांक 21 May 2019 वेळ 10:55 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित

वाडा तालुक्यातील शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित

  • शिक्षण विभागाचा गलथान कारभार

WADA SHIKSHAK VETAN AAYOप्रतिनिधी/कुडूस, दि. 14 : वाडा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील काही शिक्षक सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापासुन वंचित असून, शिक्षकांचे असे अनेक प्रश्‍न प्रलंबित असल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, हे प्रश्‍न लवकरात लवकर निकाली न काढल्यास उपोषणाचे हत्यार उपसण्याचा इशारा शिक्षक सेनेने दिला आहे .

राज्यातील कर्मचार्‍यांना एकीकडे सातव्या वेतन आयोगाचे वेध लागले असून शासन लवकरच सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. असे असताना वाडा तालुक्यातील शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील 60 शिक्षकांना अजूनही सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची पहिल्या व दुसर्‍या हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. राज्यात सहावा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू करायला एप्रिल 2009 उजाडल्याने जानेवारी 2006 ते मार्च 2009 या कालावधीतील 39 महिन्यांची फरकाची रक्कम समान पाच हप्त्यामध्ये कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करून त्यावर व्याज देण्यात आले. परंतु वाडा तालुक्यातील सुमारे 60 शिक्षकांना अजूनही फरकाची रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम पंचायत समितीच्या वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली असुन येथे काही वर्षांपासुन ही रक्कम पडून आहे. या 60 अन्यायग्रस्त शिक्षकांनी गेली तीन-चार वर्ष पंचायत समितीचे उंबरठे झिजवले. मात्र कोणीही त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे याला सर्वस्वी शिक्षण विभागातील कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप शिक्षक जितेंद्र पाटील यांनी केला आहे.

याचबरोबर 12 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतन श्रेणी लागू करण्यात येते. त्यानुसार वाडा तालुक्यातील सुमारे 250 शिक्षकांची सेवा 14 ते 16 वर्ष होऊनही त्यांना ही वेतनश्रेणी मंजूर करण्यात आलेली नाही. तसेच शिक्षकांची वैद्यकीय देयके सहा महिन्यांपूर्वी जिल्हा स्तरावरुन मंजूर होऊन आलेली असताना या शिक्षकांना बिलाची रक्कम देण्यात आलेली नाही. तर शिक्षकांची सेवापुस्तके अद्यावत करण्याचे काम शिक्षण विभागाचे असताना गेली तीन ते चार वर्ष सेवा पुस्तके अद्यावत करण्याचे काम विभागाने केलेले नाही. शिक्षकांच्या या प्रश्‍नांवर शिक्षक सेनेने मागील दोन वर्ष सतत पाठपुरावा करूनही त्याची कोणतीही दखल पंचायत समितीने घेतली नाही. त्यामुळे येत्या आठवडाभरात हे प्रश्‍न निकाली न काढल्यास शिक्षक सेना पंचायत समितीसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष दिनेश खिल्लारे यांनी दिला आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top