> उपाययोजनेकरिता दिल्या कडक सूचना
प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : तालुक्यातील सापने गावात पाच दिवसांपूर्वी डेंग्यूचे रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होऊ लागल्याने या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आरोग्य यंत्रणेला कडक सूचना दिल्या. आज, रविवारी सवरा यांनी सापने गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचार्यांसह गावातील नागरिकांशी चर्चा करत परिस्थिती जाणून घेतली व यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेत त्यांच्यावर होत असलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली.
सापने गावात एकूण 17 जणांना डेंग्यूची लागण झाली असून सहा रुग्णांवर ठाणे येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय व होरायझन या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर चार रुग्णांवर वाड्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू अन्य रुग्णांवर वाडा, अंबाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गावात तापाची साथ कायम असून आठवडा व्हायला आला तरी साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या साथीचे गांभीर्य लक्षात घेत आदिवासी विकासमंत्री सवरांनी आज सापने गावाला भेट देत परिस्थिती जाणून घेतली व आरोग्य यंत्रणा करत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी साथ नियंत्रणात येईपर्यंत वैद्यकीय पथक गावात ठेवणे, रुग्णांवर गोर्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करावेत, रुग्णांची ने – आण करण्यासाठी रुग्णवाहिका अथवा अन्य वाहन गावात उपलब्ध ठेवणे, आवश्यकता असल्यासच रुग्णांना ठाणे येथे स्थलांतरीत करावे, त्याचप्रमाणे डेंग्यूच्या साथीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरणात असल्याने त्यांचे समुपदेशन करण्याच्या सूचना मंत्री सवरा यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही चर्चा केली.
त्यानंतर सवरांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. यावेळी जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी सागर पाटील, पंचायत समिती सदस्य नरेश काळे, नगरसेवक मनिष देहरकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. हेमंत सवरा उपस्थित होते. दरम्यान भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनीदेखील सापने गावाला भेट देऊन साथ आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या.
संबंधित बातमी : सापने गावात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याने भितीचे वातवरण
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!