दिनांक 18 June 2019 वेळ 6:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » शिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम

शिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम

  • पी. जे. हायस्कूल मुख्याध्यापकपदाचा वाद
  • स्वाक्षरी अधिकार देतानाही सेवाज्येष्ठता डावलली

प्रतिनिधी/वाडा, दि. 21 : दि वाडा एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे गणेशोत्सव व दसर्‍यासारखे महत्वाचे सण वेतनाविना साजरे करण्याचा प्रसंग ओढवलेल्या येथील पी. जे. हायस्कूलमधील शिक्षकांवर येणारी दिवाळीही वेतनाशिवाय साजरी करावी लागणार असल्याचे चित्र दिसू लागल्याने गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेली शिक्षकांची आर्थिक कोंडी कायम आहे.

31 मे 2018 रोजी रिक्त झालेल्या मुख्याध्यापकपदी सेवाज्येष्ठता डावलून हितसंबंधातील शिक्षकाची वर्णी लावण्याच्या संस्थेच्या निर्णयामुळे मुख्याध्यापकपद वादात अडकले आहे. त्यामुळे मुख्याध्यापकपदाला शिक्षण विभागाकडून मान्यता मिळू शकलेली नसल्याने स्वाक्षरीच्या अधिकाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून पी. जे. हायस्कूलमधील शिक्षकांचे वेतन रखडले आहे. शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. म्हणून पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी वारंवार पत्रव्यवहार करून सेवाज्येष्ठ शिक्षकाचा मुख्याध्यापकपदाचा प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात संस्थेला कळविले आहे. मात्र तरीही संस्थेने नव्याने प्रस्ताव सादर केला नाही. त्यामुळे स्वाक्षरीच्या अधिकाराचा प्रश्‍न निर्माण झाला असुन जुलैै महिन्यापासून शिक्षकांची पगारबिले शिक्षण विभागाकडे सादर होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांना पगारापासून वंचीत रहावे लागले आहे.

शिक्षकांचे वेतन थांबू नये म्हणून शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकपदा व्यतिरिक्त अन्य सेवाज्येष्ठ शिक्षकाला स्वाक्षरीचे अधिकार देऊन तसा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्याच्या सूचना संस्थेला दिल्या होत्या. त्यानुसार सेवाज्येष्ठ शिक्षकाला स्वाक्षरीचे अधिकार देण्याऐवजी संस्थेने कनिष्ठ शिक्षिका शरयू किर्तीकर यांना स्वाक्षरीचे अधिकार देणारा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर केला. त्यानुसार त्यांना 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत स्वाक्षरीचे अधिकार देणारा आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिला, मात्र त्याचवेळी सेवाज्येष्ठ शिक्षक मंगेश डेंगाणे यांनी संस्थेने किर्तीकर यांच्या पाठवलेल्या प्रस्थावास हरकत घेतल्याने शिक्षणाधिकार्‍यांनी किर्तीकरांना दिलेले स्वाक्षरीच्या अधिकाराचे आदेश रद्द केल्याने पी. जे. हायस्कूलमधील शिक्षकांचे वेतन येत्या दिवाळीतही होईल की नाही? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शिक्षण विभाग वारंवार संस्थेला सेवाज्येष्ठ शिक्षकाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत असताना संस्थाचालक, मुख्याध्यापक व स्वाक्षरीच्या अधिकाराकरिता कनिष्ठ शिक्षकांचे प्रस्ताव का पाठवत आहेत? असा प्रश्‍न निर्माण होत असून यात नेमके कोणाचे हितसंबंध गुंतलेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. संस्थेच्या या मनमानी कारभारामुळे शिक्षकांना नाहक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून चार महिन्यांपासून वेतन थकल्याने घरखर्चासह कर्जाचे हप्ते भरणे त्यांच्यासाठी जिकिरीचे बनले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top