दिनांक 17 January 2020 वेळ 9:09 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सागरी अतिक्रमणाविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छीमार एकवटले

सागरी अतिक्रमणाविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छीमार एकवटले

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : मासेमारी करिता मच्छीमारांवर लादण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करून वसई तालुका व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार मासेमारी करत असल्याने याविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छिमार एकवटले आहेत. नियम मोडणार्‍या या मच्छिमारांवर शासन कोणतीही कारवाई करत नसल्याने अशा मच्छीमारांना स्वत:च रोखण्याचे यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीमध्ये ठरले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासुन धुमसत असलेला सागरी वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

संग्रहीत छायाचित्र

संग्रहीत छायाचित्र

गेल्या आठवड्यातच पालघरमधील वडराई, माहीम समुद्रकिनार्‍यापासुन 12 नॉटिकल मैलावर दोन ट्रॉलर आढळून आले होते. या ट्रॉलरमध्ये लाखो रुपयांचे मासे होते. या घटनेनंतर पालघर जिल्ह्यातील मच्छिमार जागे झाले असुन समुद्रातील हद्दीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. समुद्रातही वसई-उत्तन विरुद्ध पालघर-डहाणू अशा हद्दीचा प्रश्‍न मागील 40 वर्षांपासून खदखदत असून अनेक चर्चा, निवेदने, मंत्र्यांच्या भेटी अंतीही हा प्रश्‍न निकाली काढण्यात यश आलेले नाही.

या वादा संदर्भात 20 जानेवारी 1983 साली 28 मच्छिमार गावातील नेमलेल्या समितीची बैठक तत्कालीन आमदार मारुतीराव मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. प्रत्येक भागातील मच्छीमारांनी आपल्या गावा समोरील समुद्रात मासेमारी करावी, असा ठराव यावेळी घेण्यात आला होता. या ठरावाच्या अनुषंगाने तशी अंमलबजावणी देखील करण्यात येत होती. मात्र वंश परंपरागत पद्धतीने ठरवून दिलेल्या मासेमारी नियमांना डावलून वसई भागातील मच्छीमारांनी आपले क्षेत्र सोडून अन्य भागात अतिक्रमणे करायला सुरुवात केली. त्यामुळे समुद्रात संघर्षाच्या घटना घडू लागल्या. त्यावेळी ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी इकबाल सिंग चहल यांच्या दालनात 18 ऑक्टोबर 1993 रोजी सर्व मच्छिमार प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संघर्ष टाळण्यासाठी प्रत्येक मच्छिमारांनी आपल्या गावासमोरच कव (सिगनेट) मारुन मासेमारी करण्याचे आदेश दिले होते. पुन्हा सन 2004 मध्येही वसई तालुक्यातील मच्छीमारांनी समुद्रात बेसुमार कवी मारल्याचे दिसून येत असल्याने सातपाटीच्या पश्चिमेस 42 नॉटिकलपर्यंत मारण्यात आलेल्या कवी काढण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. समुद्रात कोणी कुठे जाळी मारीत मासेमारी करावी याबाबत शासनाचे कायदे, नियम नसल्याच्या बाबीचा फायदा उचलत वसई तालुक्यातील मच्छिमार फिलिप मस्तान व इतर काही लोकांनी उच्च न्यायालायत याचिका दाखल करीत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती मिळवत (24 जून 2004) जैसे थे परिस्थिती ठेवण्यात यश मिळविले होते. त्याचा फायदा घेत वसई, अर्नाळा, उत्तन, मढ, गोराई आदी भागातील बोटींनी (बल्ल्याव) प्रत्येकी 18 ते 20 कवी अशा 25 ते 30 हजार कवी मारल्याचे जिल्ह्यातील मच्छीमारांचे म्हणणे आहे.

समुद्र किनार्‍यापासून 50 ते 60 नॉटिकल क्षेत्रापर्यंतच मासेमारी केली जात असून या क्षेत्रात ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म्स तर दुसरीकडे उत्तन, वसई, मढ येथील मच्छीमारांच्या हजारो कवीनी मासेमारीचे मोठे क्षेत्र गिळंकृत केल्यामुळे मासेमारीसाठी क्षेत्रच उरत नसल्याने मासे पकडण्यासाठी आम्ही जाळी मारायची कुठे? असा प्रश्‍न पालघर, गुजरात व दमणमधील मच्छीमारांनी उपस्थित केला आहे.

या विरोधात सातपाटी, डहाणू, मुरबे, दमण, झाई, उंबरगाव, गुंगवाडा, फणसा, पोफरण, दांडी, वरोर, घिवली, नारगोल, धाकटी डहाणू, कोरे, उसरणी, केळवे, टेम्भी, वडराई, माहीम, एडवण आदी भागातील तीस सहकारी संस्थेची बैठक सातपाटी येथे सोमवारी पार पडली. या बैठकीत ठरलेल्या निर्णयाप्रमाणे शासनास अर्ज, निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने आपापल्या गावासमोरील समुद्रात जाऊन इतर भागातील मच्छीमारांना रोखण्याचे ठरले असुन त्यामुळे समुद्रात मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top