दिनांक 09 December 2019 वेळ 10:11 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात दुष्काळाची झळ : शेतकर्‍याने स्वतःचे भातपिक पेटविले

वाड्यात दुष्काळाची झळ : शेतकर्‍याने स्वतःचे भातपिक पेटविले

>> पावसाअभावी भातपिक गेले करपून

WADA DUSHKALप्रतिनिधी/वाडा, दि. 15 : तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांच्या साडेतीन एकर जमिनीवरील भातपिक पाण्याअभावी पूर्णपणे करपूरन गेल्याने व शासनामार्फत नुकसान भरपाईसाठी कोणत्याही प्रकारचा पंचनामा न केला गेल्याने संतापलेल्या मोकाशी यांनी शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून स्वत:ची भातशेती पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

यंदा तालुक्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होता. त्यामुळे पेरणी व भातलागवडीची कामे सुरळीत झाली होती. भातपिकेही चांगली बहरली होती. मात्र भातपिकांच्या दाणा भरणीसाठी आवश्यक असणार्‍या परतीच्या पावसाने दडी मारल्याने भाताचा दाणा परिपक्व झाला नाही व भातपिके लाल पडून करपुन गेली. जमिनीलाही भेगा पडल्या. त्यामुळे भाताचे दाणे तर नाहीच परंतु भाताचा पेंढा सुद्धा हाताला लागला नाही. त्यामुळे तुसे येथील शेतकरी अशोक मोकाशी यांनी नैराश्यापाई आपले भातपिक पेटवून देऊन संताप व्यक्त केला.

या गावातील वसंत गणपत मोकाशी, योगेश मोकाशी, विनायक मोकाशी, कृष्णा मोकाशी, तुकाराम मोकाशी, विजय मोकाशी, मंगूलाल मोकाशी, नारायण लहू मोकाशी, दीपक मोकाशी, गजानन मोकाशी, दत्तत्रेय मोकाशी, गणपत श्रीपद मोकाशी, शंकर काळुराम मोकाशी या शेतकर्‍यांचे पावसाअभावी मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. एका तुसे गावातीलच जवळपास 50 ते 60 टक्क्यांच्या वर भातशेतीचे नुकसान झाले असल्याचे गावातील शेतकर्‍यांनी सांगितले.
तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी भातशेतीवर आवलंबुन आहेत. भातशेती लागवड करण्यासाठी हे शेतकरी विविध सेवा सहकारी सोसायट्या, बँका तसेच खाजगी कर्ज घेऊन शेती करत असतात. त्यात महागडी खते, बी-बियाणे, मजुरीचा खर्च व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे कठीण होऊन बसले आहे. अशातच गेल्या दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण व मुलांचे शिक्षण करायचे तरी कसे? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.

दरम्यान संपूर्ण तालुक्यात अशीच परिस्थिती असल्याने तालुक्यात दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

>> प्रशासनाचे दुर्लक्ष

तुसे येथील शेतकर्‍यांनी महसुल व कृषी विभागाकडे तक्रारी करून भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

>> कृषी आणि महसुलच्या फेर्‍यात अडकली नुकसानग्रस्त शेती

तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून विविध गावांतील शेतकर्‍यांनी महसुल व कृषी विभागाकडे शेतीचे पंचनामे करून तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करावा अशी निवेदनांद्वारे मागणी केली आहे. परंतु महसुल विभागातील नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता राज्यशासनाकडून आदेश आल्यानंतर शेतीचे पंचनामे करण्यात येतील तर कृषी अधिकारी माधव हासे यांनी दुष्काळग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आम्हाला जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश आलेले नाहीत, अशी माहिती दिली. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत असून नक्की न्याय कोण देणार या संभ्रमात आहेत.

माझ्या साडेतीन एकराच्या भातशेतीतील संपूर्ण पीक नष्ट झाले असून भातपिक लागवडीसाठी मी तुसे सेवा सहकारी सोसायटीकडून 85 हजारांचे कर्ज घेतले आहे. भात पिक तर गेले आता कर्ज कसे फेडायचे असा प्रश्‍न माझ्या समोर आहे.
– अशोक मोकाशी,
बाधित शेतकरी

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top