>> चित्राच्या भूमिकेत झळकली सायली पाटील
वाडा/कुडूस, दि. 7 : मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारुन सर्वांचे लक्ष वेधून घेणार्या वाडा तालुक्यातील चिंचघरपाडा (कुडूस) गावाची कन्या सायली पाटील हिने बॉईस 2 या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात दमदार प्रवेश केला असून चित्रपटात चित्राच्या मुख्य भूमिकेत ती झळकली आहे.
महाराष्ट्र टाइम्सच्या श्रावण क्विनपासून मॉडलिंगच्या जगतात प्रवेश केल्यानंतर तिने छोट्या पडद्यावरील गणपती बाप्पा मोरया या मालिकेमध्ये पार्वतीची भूमिका साकारली होती. तर असा सासर सुरेख बाई या मालिकेमध्ये जुईची भूमिका साकारुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सायलीने मालिकांमधील साकारलेल्या पात्रांना दिलेल्या योग्य न्यायामुळेच तिची मराठी चित्रपटांमधील एंट्री ही धमाकेदार असणार होतीच हे निश्चित मानले जात होते.
सुपर हिट ठरलेल्या बॉईजनंतर आत्ता बॉईज 2 मध्ये देखील याच ढुंग्या (पार्थ भालेराव), धैर्या (प्रतीक लाड) आणि कबीर (सुमंत शिंदे) हे तिघे महत्वाच्या भुमिकेत असून त्यांच्या जोडीला चित्रा (सायली पाटील) हिची भूमिका महत्वाची आहे.
बॉईज 2 या चित्रपटामधे ढुंग्या, धैर्या, कबीर हे तिन्ही मित्र बारावीत असून त्यांचे नर्या (ओंकार भोजणे) या सिनिअर सोबत चांगलेच वाकडे आहे. त्याच्या सोबत सतत ढुंग्या आणि धैर्या यांची भांडणे होत असतात. या सगळ्यांपासून दूर राहण्यासाठी कबीर बारावीच्या वर्षात हॉस्टेलला न राहायचे ठरवतो. पण कॉलेजमध्ये नव्याने आलेल्या चित्रा (सायली पाटील) च्या तो प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी तो होस्टेलला राहायला येतो. पण कबीर, ढुंग्या आणि धैर्या यांचे नर्या सोबतचे वाद सुरूच असतात. त्यात या सगळ्यांमध्ये एक पैज लागते. ही पैज पूर्ण करू न शकणार्याला कॉलेज सोडून जावे लागेल असे ठरते. अशी चित्रपटाची थोडक्यात स्टोरी असून सायली पाटील हिच्या भूमिकेमुळे तालुक्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहामधे वळला आहे.
माझे शिक्षण शहरात झाले असेल तरी गावाकडील ओढ ही आजही कायम आहे. गावाकडे आल्यानंतर येथील लोकांचे प्रेम, आपुलकीने मी भारावून जाते. खरे तर हेच प्रेम, हिच आपुलकी आपल्याला पुढे जाण्यास प्रेरणा देते. छोट्या पडद्यावरील मालिकांमधील कामाचे अनेकांनी कौतुक केले. आत्ता बॉईज 2 सिनेमा बघुन तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा.
– सायली पाटील, सिनेअभीनेत्री (बॉईज 2)
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!