जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ

0
9

img-20181006-wa0012__01929606205529512057.jpgराजतंत्र मिडीया/डहाणू दि. ६ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर (डहाणू) या २१ वर्षीय युवकाच्या जगण्यासाठीच्या संघर्षाला बळ देण्यासाठी डहाणूतील महिला शक्ती पुढे सरसावली आहे. शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या अनाहिता नजमी यांनी त्यासाठी पुढाकार घेत सोशल मिडीयाच्या माध्यमातून आव्हान केले. त्यांच्यासह काही महिलांच्या पुढाकाराने मदतफेरीचे आयोजन करण्यात आले आणि मळेकर कुटुंबियांना डहाणू शहरातून ५ लाख २० हजारांची भरघोस मदत मिळविण्यात त्यांना यश आले. नवरात्रौत्सवाची चाहूल लागत असतानाच, महिलांनी निर्धार केला तर कुठलेही आव्हान त्या लिलया पेलू शकतात हा स्फूर्तिदायक संदेश त्या निमित्ताने दिला गेला आहे. महिला शक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने कुणालच्या डोक्याला जबर इजा झाली होती. वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये (मीरा रोड) त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तो आजतागायत बेशुद्धावस्थेतच आहे. त्याच्या मेंदुची कवटी निरीक्षणासाठी उघडी ठेवूनच त्याच्यावर उपचार चालू होते. आता कवटी बसविण्यात आल्यानंतर पुढील टप्प्यांचे उपचार बॉम्बे हॉस्पिटल (मुंबई) येथे चालू असताना कुणाल सकारात्मक प्रतिसाद देत आहे. कुणालचे वडील सेवानिवृत्त असून दीड वर्षांच्या त्यांच्यासाठी खडतर ठरलेल्या कालावधीत त्यांच्याकडे होते नव्हते ते खर्च झालेले. त्यांच्या आटोक्यात पुढील उपचार नाहीत. याआधी देखील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या जोरावरच त्यांची लढाई सुरु आहे. त्याच्या उपचारासाठी याआधी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी वेळोवेळी भरघोस मदतही केलेली आहे. आता पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यातील लढाईसाठी लोकांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन कुणालचे वडील प्रवीण मळेकर यांनी केले होते.

प्रवीण मळेकर यांनी दैनिक राजतंत्रमधून केलेल्या आवाहनाला अनाहिता नजमी यांनी लगेचच प्रतिसाद दिला. त्यांनी वैयक्तिक पातळीवर जे करता येईल ते केलेच पण पुढाकार घेऊन मदतफेरीचे आयोजन देखील केले. त्यांना महिला वर्गाने मोठा प्रतिसाद दिला. ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या या मदतफेरीला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कुणालच्या मदतीसाठी तब्बल ५ लाख २० हजारांची राशी जमा झाली. यामध्ये ३ लाख ६५ हजार रोखीने व ६५ हजार रुपयांचे धनादेश जमा झाले आहेत. अन्य काही व्यक्तींनी धनादेशाद्वारे मदत देण्याचे कबूल केले असून त्याप्रमाणे ९० हजार रुपये प्राप्त होणार आहेत. प्रवीण मळेकर यांनी मदतफेरीमध्ये सहभागी होणारे व सर्व दानशूर व्यक्तींचे आभार व्यक्त केले आहेत.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

APP DOWNLOAD

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments