दिनांक 18 June 2019 वेळ 6:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » रोहयो समितीचा पालघर दौरा, प्रशासनाची फलकबाजी

रोहयो समितीचा पालघर दौरा, प्रशासनाची फलकबाजी

ROHIYO DAURA-WADAप्रतिनिधी/वाडा, दि. 3 : रोजगार हमी योजनेची विधीमंडळ समिती 4 व 5 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असल्याने जिल्ह्यातील प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून झालेल्या कामांवर ऐन वेळी फलक लावण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, वनखाते, ग्रामपंचायत आदी यंत्रणांकडून रोजगार हमी योजनेची असंख्य कामे मागील वर्षी करण्यात आली. या कामांवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च झाला. ही कामे करताना संबंधित यंत्रणांनी कामाची माहिती दर्शवणारे विशेषतः प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रकीय रक्कम आदी दर्शवणारे फलक कामाच्या ठिकाणी काम सुरू असतानाच लावणे बंधनकारक आहे. मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करून फलक लावत नाहीत. त्यामुळे दुर्गम भागात होणार्‍या कामांवर नेमका किती निधी खर्च होतो हे सामान्य जनतेला समजत नाही. त्यामुळे अधिकार्‍यांच्या या फलक न लावण्याच्या भूमिकेमुळे पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.

मात्र आता आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेची विधीमंडळ समिती जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असल्याने जागे झालेल्या प्रशासनाकडून तालुक्यातील विविध भागात सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणी फलक लावण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, रोजगार हमी योजनेची कामे ही कायम संशयाच्या भोवर्‍यात असतात. या कामातील कुशल व अकुशल कामावर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. कामात भ्रष्टाचारामुळे यापुर्वी समितीने अनेक अधिकार्‍यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे या दौर्‍यात रोहयोमधील गैरव्यवहारावर समिती कशाप्रकारे कटाक्ष टाकते यांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top